May 14, 2026 4:26 pm

विकास कामांसाठी सांगली महापालिकेचे १०० कोटींचे कर्जरोखे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महापालिका शहरातील विकास कामांसाठी १०० कोटींचे रोखे विक्री करणार असून प्रामाणिक करदात्यांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा महापौर धीरज सुर्यवंशी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.कोणतीही करवाढ नसलेले १ हजार ६१६ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणी जागा असून त्या जागांचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करून महापालिकेचे उत्पन्न वाढ करण्याचा मनोदय आहे. यासाठी १०० कोटींचे रोखे रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने विक्रीस आणले जाणार आहेत. तसेच शासनाकडून मिळणारे अनुदान २०० कोटींचे स्वतंत्रपणे अपेक्षित असून या माध्यमातून १६१६ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा महापौर सुर्यवंशी यांनी केली.

थकीत करवसुलीसाठी महापालिकेकडून अभय योजना राबविण्यात येते. जे थकित राहतात त्यांना या सवलतीचा लाभ मिळतो. मात्र, प्रामाणिकपणे नियमितपणे करभरणा करणार्‍या नागरिकांवर हा अन्याय ठरत असल्याने यावर्षीपासून आगामी तीन व पाच वर्षाचा आगाउ करभरणा, पाणी पट्टी भरणार्‍यास सवलत दिली जाणार आहे. आगाउ घरपट्टी भरणा करणार्‍यांना सामान्य करात ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे.

प्रत्येक सदस्यांना स्थानिक विकास निधी म्हणून ३० लाख रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. यातून प्रभागातील विकास कामांना निधी दिला जाईल. याशिवाय शहराला जोडणार्‍या रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्याच प्रस्ताव आहे. पक्षी संग्रहालयाबरोबरच मत्स्य संग्रहालय उभारणीचा प्रस्ताव आहे. तसेच महापालिकेच्या काही शाळा स्मार्ट स्कूल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी शिवशंभूसृष्टी उभारण्यात येणार आहे. तसेच सांगली व मिरज शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे.

सांगलीत कबड्डी, मिरजेत फुटबॉल आणि कुपवाडमध्ये खोखो खेळासाठी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून महापालिकेच्यावतीने कृष्णमाई उत्सवही साजरा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, माझ्यात आणि स्थायी समिती सभापती यांच्यात कुठलेही मतभेद अथवा वाद नसून आम्ही सर्वजण शहराचा विकास साधण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचा खुलासा महापौर सुर्यवंशी यांनी यावेळी बोलताना केला.विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी अंदाजपत्रक मंजुरीबाबत दिलेला इशारा हा केवळ प्रसिध्दीसाठी असून त्यांना आज अंदाजपत्रक मंजुरीची घोषणा केली जाणार असल्याचे माहित होते असेही त्यांनी सांगितले.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!