May 14, 2026 8:52 pm

माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या दौऱ्याला आंबेडकरी संघटनांचा तीव्र विरोध

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या यवतमाळ दौऱ्यावरून जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे.बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याने आणि अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून आंबेडकरी संघटनांनी न्या.गवई यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी लावलेले त्यांचे स्वागत फलक कार्यकर्त्यांनी फाडून टाकले. या वाढत्या तणावामुळे न्या. गवई यांचा आजचा यवतमाळ दौरा रद्द होणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी न्या. गवई येणार असल्याने शहरात त्यांच्या स्वागताचे मोठे बॅनर लावण्यात आले होते. यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ज्या वकिलांनी हे फलक लावले होते, थेट त्यांच्या घरावर धडक दिली. ‘समाजद्रोही काम करणाऱ्यांचे स्वागत कसे करता?’, असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी संबंधित विधीज्ञांना धारेवर धरले. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा गरम असताना असे कृत्य समाज सहन करणार नाही, अशी तंबी दिल्यानंतर संबंधित वकिलांनी तातडीने ते बॅनर उतरवण्याची हमी दिली. ॲड. जयसिंह चव्हाण, उमेश मेश्राम, प्रमोदिनी रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वतः उभे राहून हे बॅनर खाली उतरवले.

दरम्यान आज शनिवारी सायंकाळी स्थानिक विधी महाविद्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी न्या. भूषण गवई हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख आणि विविध उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. परंतु, शहरातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी न्या. भूषण गवई यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने गवई यांच्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. समाज माध्यमातून न्या. गवई यांचा दौरा रद्द झाल्याचा संदेश फिरत आहे. याबाबत कार्यक्रमाचे आयोजक असलेले माजी आमदार कीर्ती गांधी यांना विचारले असता, न्या. भूषण गवई यांचा आजचा दौरा रद्द झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर, स्थानिक अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षणक नंदकुमार काळे यांनीही न्या. गवई यांचा दौरा रद्द झाल्याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळाली नसल्याचे बोलताना स्पष्ट केले.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकरी आणि पुरोगामी चळवळीतून त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. अंनिसचे प्रा. श्याम मानव यांनी, न्या. भूषण गवई यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका केली. विशेष म्हणजे, यवतमाळ येथे आज सायंकाळीच प्रा. श्याम मानव यांचेही व्याख्यान होणार आहे. याचवेळी माजी सर न्यायाधीश भूषण गवई हे सुद्धा यवतमाळात असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती प्रशासनास आहे. प्रा. श्याम मानव यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आजच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार ठेवला आहे. ‘माणूस जन्माने आंबेडकरी नाही होत, तर विचारांनी आंबेडकरी होतो, हेच प्रा. श्याम मानव यांनी दाखवून दिले’. त्यामुळे त्यांचा सत्कार घेत असल्याची प्रतिक्रिया ॲड. जयसिंग चव्हाण यांनी दिली.

‘आमच्या महापुरुषांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्यांचे स्वागत कदापि खपवून घेणार नाही’, अशी भूमिका आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. या आंदोलनात संजय बोरकर, अंकुश वाकडे, रवींद्र टेंभुर्णी, डॉ. जांभूळकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आता सर्वांचे लक्ष आजच्या कार्यक्रमाकडे लागले असून, यवतमाळात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील वातावरण पाहता कार्यक्रम पार पाडणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!