May 14, 2026 11:55 pm

माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या १६ शाळांवर अखेर ‘प्रशासक राज’

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेला शिक्षण विभागाने मोठा धक्का दिला आहे. माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या या संस्थेच्या १६ शाळांचा कारभार अखेर प्रशासकांनी ताब्यात घेतला आहे.

एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने शाळांवर प्रशासक नियुक्त झाल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, या घटनेला ‘शैक्षणिक भूकंप’ म्हणून संबोधले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या शाळांमधील कारभार शिक्षण विभागाच्या रडारवर होता. संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या तपासणीत विविध त्रुटी आणि आर्थिक गैरव्यवहार आढळून आल्याचा ठपका शिक्षण विभागातर्फे ठेवण्यात आला आहे. त्यानुसार नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांनी संस्थेच्या शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याची शिफारस पुणे येथील शिक्षण संचालकांकडे केली होती. त्याची दखल घेत शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संबंधित शाळांची स्वतंत्र सुनावणी घेतली आणि गेल्या मार्च महिन्यात संस्थेच्या एकूण २६ शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले.

शिक्षण संचालकांच्या या आदेशाच्या विरोधात २६ पैकी १० शाळांनी राज्य शासनाकडे अपील दाखल केले. राज्य शासन म्हणजे पर्यायाने शिक्षण मंत्र्यांकडे या अपीलावर सुनावणी होणे अभिप्रेत होते. मात्र,शिक्षण मंत्री दादा भुसे व हिरे कुटुंब हे परस्परांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांच्या आदेशाविरोधातील अपिलावर भुसे यांच्याऐवजी अन्य मंत्र्यांकडे सुनावणी घेण्याचे निर्देश द्यावेत, यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान राज्य शासनाच्या वकिलांनी ‘कंडक्ट ऑफ बिझनेस रुल्स’ नुसार मंत्र्यांपुढे अपील चालवण्यात येईल आणि ८ आठवड्यांच्या आत त्यावर निर्णय दिला जाईल, अशी ग्वाही दिली होती. ही बाब उच्च न्यायालयाने मान्य केली. तसेच राज्य शासनाकडे केलेल्या अपिलावर निर्णय झाल्यावर १५ दिवसांच्या कालावधीपर्यंत शिक्षण संचालकांच्या प्रशासक नियुक्ती आदेशांची अंमलबजावणी करु नये,असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे अपीलात गेलेल्या शाळांना व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेला हा एक प्रकारे तात्पुरता का होईना, मात्र दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

शिक्षण संचालकांनी २६ शाळांना प्रशासक नेमण्याचे जे आदेश दिले ते स्वतंत्ररित्या दिले आहेत. त्यानुसार या निर्णयावर राज्य शासनाकडे अपील करावयाचे असल्यास या सर्व शाळांनी स्वतंत्रपणे अपील करणे आवश्यक होते. मात्र,२६ पैकी फक्त १० शाळांनीच अपील दाखल केले आहे. त्यामुळे अपीलात न गेलेल्या १६ शाळांवरील प्रशासक नियुक्ती आदेशाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग शिक्षण विभागाच्या दृष्टीने मोकळा झाला. त्यानुसार शिक्षण विभागाकडून प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली व गेल्या दोन दिवसात १६ शाळांमधील व्यवस्थापकीय कारभार प्रशासकांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. आपल्या संस्थेकडील या शाळांचे व्यवस्थापन आता राज्य शासनाकडे गेल्याने प्रशांत हिरे कुटुंबियांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

ज्या १० शाळांनी शिक्षण संचालकांच्या प्रशासक नियुक्तीच्या आदेशाविरोधात राज्य शासनाकडे अपील दाखल केले आहे, या अपीलांवरील सुनावणी मंत्र्यांऐवजी शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांकडे ठेवण्यात आली आहे. गेल्या ३० एप्रिल रोजी प्रधान सचिवांकडे या संदर्भातील प्राथमिक सुनावणी पार पडली. या निकालाकडे आता लक्ष लागलेले आहे.

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या प्रशासक नियुक्त झालेल्या शाळा व ज्या अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे,त्यांची नावे अशी:

सेवा इंग्लिश स्कूल खाकुर्डी – चित्रा देवरे, गटशिक्षणाधिकारी बागलाण, केबीएच विद्यालय मुंगसे – शितल तावडे गटशिक्षणाधिकारी चांदवड, भाऊसाहेब हिरे माध्यमिक विद्यालय टाकळी – दिलीप नाईकवाडे गटशिक्षणाधिकारी नांदगाव, जनता विद्यालय मानूर – परसराम महाले गटशिक्षणाधिकारी कळवण, लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय डाबली – चित्रा देवरे गटशिक्षणाधिकारी बागलाण, एस.पी.एच माध्यमिक विद्यालय उमराणे – सतीश बच्छाव गटशिक्षणाधिकारी देवळा, केबीएच माध्यमिक विद्यालय मळगाव – दिलीप नाईकवाडे गटशिक्षणाधिकारी नांदगाव, केबीएच माध्यमिक विद्यालय शेरुळ – नीलेश पाटील गटशिक्षणाधिकारी मालेगाव, केबीएच विद्यालय वडेल – चित्रा देवरे गटशिक्षणाधिकारी बागलाण, एलव्हीएच माध्यमिक विद्यालय तिसगाव – सतीश बच्छाव गटशिक्षणाधिकारी देवळा, एलव्हीएच विद्यालय भायगाव – नीलेश पाटील गटशिक्षणाधिकारी मालेगाव, आरबीएच कन्या विद्यालय मालेगाव कॅम्प – तानाजी घोंगडे प्रशासनाधिकारी मालेगाव महानगरपालिका शिक्षण मंडळ, समाजश्री प्रशांतदादा हिरे माध्यमिक विद्यालय मालेगाव – तानाजी घोंगडे, प्रशासनाधिकारी मालेगाव महानगरपालिका शिक्षण मंडळ, एलव्हीएच विद्यालय वाके – शितल तावडे गटशिक्षणाधिकारी चांदवड, लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय खायदे – नीलेश पाटील गटशिक्षणाधिकारी मालेगाव.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!