April 21, 2026 7:55 pm

समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता सुनील साठे – जयसिंग डुंबरे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पिंपरी, पुणे (दि. २१ एप्रिल २०२६) राजकारणात पदाची अपेक्षा न करता कायम लोकांना मदत करणारा आणि कार्यकर्त्यांसाठी झटणारा, उपक्रमशील माणूस म्हणजे सचिन साठे हे आहेत, त्यांच्या बरोबर नेहमी खांद्याला खांदा लावून काम करणारा व समाजाप्रती कायम कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता स्वर्गीय सुनील बबन साठे यांचे नाव घ्यावे लागेल असे पुणे शिक्षण मंडळाचे माजी सचिव जयसिंग डुंबरे यांनी सांगितले.

अक्षय तृतीयेचे औचित्य साधून सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपळे निलख, विशालनगर येथे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी सुनिल बबन साठे यांच्या स्मरणार्थ “सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सत्कारमूर्ती सुभाष धोंडीराम इंगळे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम ११,५०१ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी सचिन साठे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक स्नेहाताई कलाटे, भुलेश्वर नांदगडे, काळुराम नांदगुडे, सत्कारमूर्ती सुभाष धोंडीराम इंगळे, निवृत्त डीसीपी नरेंद्र गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ थोपटे, संजय केदारी, अनंत कुंभार, अशोक मेंगळे, अशोक बनसोडे, राजाभाऊ मासूळकर, संभाजीराव इंगवले, दक्षिणमुखी मारुती ट्रस्टचे सहकारी व सचिन साठे सोशल फाउंडेशन मित्र परिवार आदी उपस्थित होते.

सचिन साठे यांनी सांगितले की, स्वर्गवासी सुनिल साठे यांना जाऊन ५ वर्षे झाली. तेव्हा कोरोनाकाळ होता. विशालनगर च्या प्रगतीसोबत ज्या समस्या येत होत्या, त्या सोडवण्यासाठी सुनिल नेहमी मदतीसाठी तत्पर राहत असे. नेहमी इतरांची कामे सांगून पाठपुरावा करून पूर्ण करणारा एक सच्चा मित्र होता. समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता ही त्याची ओळख त्याने त्याच्या कामातून निर्माण केली होती. त्यांची ही ओळख पुढे कायम रहावी या उद्देशाने स्वर्गवासी सुनिल बबन साठे यांच्या स्मरणार्थ “सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” दरवर्षी देण्याचा संकल्प आहे. हे या पुरस्काराचे पहिलेच वर्ष आहे. कामांना मूर्त स्वरूप देण्यात सुनिल यांचे योगदान होते. त्यांच्या या कार्यातून उत्तराई होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे.

स्नेहाताई कलाटे यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते जेव्हा समाजात उतरतात तेव्हा समाजाशी त्यांची अजून जवळीक निर्माण होते. समाजाप्रती ओढ असणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा जो सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने होत आहे. आपण समाजाचे देणे लागतो ते आपण समाजाला देऊया. आपल्यात असणाऱ्या व्यक्तीचे मोल अशा कार्यक्रमातून व्यक्त होत आहे.

सत्कारमूर्ती सुभाष धोंडीराम इंगळे यांनी सांगितले की, २००७ मध्ये विशालनगर येथे राहायला आल्याने येथील लोकांसोबत नाते जुळले. प्रथमच सुनिल साठे यांच्या सोबत ओळख झाली आणि त्यांच्या सोबत कार्यात जोडला गेलो. त्यांच्या एवढा महान नाही पण त्यांच्यासारखे कार्य मी कायम करत राहीन. तसेच सचिन साठे हे कार्यकर्त्यांना जपणारा माणूस आहेत. या सत्काराच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्त्यांवरचे आपलेपण दिसून येते. प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने ओळखतात. प्रत्येक कार्याला आवर्जून पत्रिका पाठवून आमंत्रित करतात, विचारपूस करतात.  स्वागत नितीन पाटील, प्रास्ताविक सचिन साठे आणि आभार भरत इंगवले यांनी मानले.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!