मुंबईकरांच्या नुकताच सेवेत आलेल्या कोस्टल रोडबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. कोस्टल रोड हा भारतातील पहिला मेलोडी रोड म्हणजेच संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्यावरून एखादे वाहन गेल्यानंतर ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याची धून वाजणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना वाहनचालकांना एक नवा अनुभव घेता येणार आहे. अद्ययावत हंगेरियन तंत्रत्रानाच्या सहाय्याने ‘जय हो’ या गाण्याची ही धून वाजणार आहे. मुंबईकरांसाठी ११ फेब्रुवारीपासून या रस्त्या खुला करण्यात आला.
मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्ता’ म्हणजे कोस्टल रोडला ‘मेलोडी रोड’ म्हणून नवी ओळख मिळाली आहे. कोस्टल रोड हा मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या रस्त्याचे अमरसन्स गार्डनजवळ उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोस्टल रोडवरून प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेता येणार आहे. ही अभिनव संकल्पना आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्याने मुंबई महानगर पालिकेच्या वतीने हा मेलोडी रोड तयार करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर ५०० मीटर लांब विशेष संगीतमय रिब्स म्हणजे पट्ट्या बसविण्यात आल्या आहेत. या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि त्यावरून ताशी ६० ते ७० किलोमीटर प्रति वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या चाकाचे होणारे घर्षण यामुळे स्वरांची निर्मिती होते. हे स्वर त्या वाहनातील प्रवाशांना ऐकू येतील. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञान, भारतीय संस्कृती आणि संगीताचा सुंदर मिलाफ म्हणून हा मेलोडी रोड सर्वांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे. या रस्त्यावरून प्रवास करण्याची प्रत्येकाचीच इच्छा आहे.
हा भारतातील पहिलाच मेलोडी रोड आहे. दक्षिण मुंबईकडून उत्तरेकडे जाताना मरीन ड्राइव्हवरील बोगदा संपल्यावर मेलोडी रोडचा प्रारंभ होतो. पहिल्या मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात ५०० मीटरपर्यंत विशेष पट्ट्या असणार आहेत. रस्त्यावरील विशेष पट्ट्या आणि ६० ते ७० च्या गतीने जाणाऱ्या वाहनाच्या चाकांच्या घर्षणातून ‘जय हो’ या गाण्याच्या स्वरांची निर्मिती होते. वाहनातील प्रवाशांना ‘जय हो’ची धून ऐकू येईल. महत्वाचे म्हणजे मुंबईमधील वातावरण, ऋतू आणि समुद्रावरील वाऱ्याच्या वेग यातही या मेलोडी रोडवरून प्रवास करताना ‘जय हो’ची धून ऐकायला मिळणार आहे. तुम्ही देखील या मेलोडी रोडवरून प्रवास करण्याचा अनुभव घेऊ शकता.











