सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन येथे नातेवाईकांच्या विवाहासाठी कॅनडातून सोलापुरात आलेल्या पाहुण्यांचे दागिने, महागडी दोन घड्याळे व डेबिट कार्ड चोरट्याने लंपास केले आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही चोरी झाली. या प्रकरणी प्रमोद राजेंद्र हलबुर्गी यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता विवाह असल्याने फिर्यादी सहा वाजता हेरिटेज लॉन येथे सहा वाजता आले. पत्नी व मुलीला यायला उशीर झाला आणि त्या दोघी पावणेआठच्या सुमारास विवाहस्थळी पोचल्या. त्यांच्याजवळ एक बॅग होती, बॅगेत दागिने, घड्याळ व विविध बॅंकांचे डेबिट कार्ड होते. वधू-वरांना भेटून आल्यावर समोरील सोफ्यावर ते बसले. दागिने असलेल्या बॅगेवर लहान मुलींची मिनी पर्स ठेवली होती आणि नातेवाईकांना भेटायला गेले. रात्री नऊ वाजता बॅग पाहिली त्यावेळी ठेवलेल्या ठिकाणी बॅग होती.
त्यानंतर आम्ही दोघे फोटो काढायला गेलो आणि साडेनऊ वाजता सोफ्यावरील बॅग पाहिली तर लहान मुलीची बॅग होती. दागिने ठेवलेली बॅग त्याठिकाणी नव्हती. इतरत्र शोध घेतला, विचारणा केली पण कोणाकडेच बॅग सापडली नाही. त्यानंतर तातडीने प्रमोद हलबुर्गी यांनी पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे प्रकटीकरण पथकाद्वारे चोरट्याचा शोध सुरु आहे.
चोरीला गेलेला मुद्देमाल असा…
दीड तोळ्याचा सोन्याचा नेकलेस
साडेतीन तोळ्याचा जाड पट्टीचा सोन्याचा हार
चार तोळे वजनाचा तीनपट्टी चेन असलेला सोन्याचा हार
एक तोळ्याची कर्णफुले
१७ हजार रुपयांची दोन घड्याळे











