पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंजनजीक जोशीविहीर येथे उड्डाणपुलाच्या उतारावर दुचाकीचा अपघात होऊन एक जण ठार झाला, तर दोघे जखमी झाले. अभिमन्यू अर्जुन पठारे (वय २६, रा.वर्ये, ता. सातारा) असे ठार झालेल्याचे नाव आहे, तर शुभम प्रकाश जगताप व श्रावणी कमलाकर जगताप अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अभिमन्यू पठारे हा पुणे येथील कंपनीत कामाला असून, तो शिवापूर येथे राहण्यास आहे. आज सकाळी सव्वाआठ वाजता तो दुचाकीवरून जात असताना जोशीविहीर उड्डाणपुलाच्या उतारावर दुचाकीचा अपघात झाला. त्यात तो ठार झाला, तर अन्य दोघे जखमी झाले.
जखमींना सातारा येथील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार डी. जी. शिंदे करीत आहेत.
वडीलांचे सुध्दा अपघाती निधन
अभिमन्यू अर्जुन पठारे यांचे वडिल अभिमन्यू पठारे यांचे सुध्दा काही वर्षापूर्वी अपघातातच निधन झाले हाेते. मात्र त्यानंतर मुलाचे सुध्दा अपघातातच निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त हाेत आहे. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ आहे.











