रांजणगाव खुरी रोड येथील एका पुठ्ठ्याच्या कंपनीला रविवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे दोन कोटी रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जस्ट पॅक इंडस्ट्रिजला आग लागल्याची घटना सहायक पोलीस निरीक्षक नीलेश शेळके यांनी अग्निशमन विभागाला दुपारी १.२० मिनिटांनी कळवली, अशी माहिती पदमपुरा अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन दलाचा एक वाळूज अग्निशमन दलाचे दोन मिळून तीन बंब अधिकारी व जवानांसह पैठण तालुक्याच्या सीमा भागात येत असलेल्या गाढेगाव गंगापूर या वाळूज-बिडकीन पाईपलाईन रोडवरील जस्ट पॅक या कंपनीत पोहोचले. शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन केंद्राच्या पथकांनी आग आटोक्यात आणली.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी लक्ष्मण कोल्हे, दीपराज गंगावणे, अग्निशामक जवान छत्रपती केकान, संग्राम मोरे, जगदीश गायकवाड, अमिताभ कराड, उमेश भोसले व वाहन चालक चंद्रसेन गीते आदींनी आग आटोक्यात आणली. याप्रसंगी जस्ट पॅक कंपनीचे मालक स्वप्नील जावळे व त्यांचे सहकारी होते.
कंपनीचे आगीमुळे दोन कोटींच्या साहित्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जस्ट पॅक ही पुठ्ठ्याची कंपनी वाळूज औद्योगिक वसाहतीसह शहर व परिसरातील अनेक कंपन्यांना पुठ्ठ्यांच्या बॉक्सचा पुरवठा करत असून, अनेक कंपन्यांच्या ऑर्डरनुसार बॉक्स बनवण्यात येत होते, असे सांगण्यात आले.











