April 23, 2026 3:36 pm

*भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा ते बिडकीन महामार्गावरील शिवपूर गावानजीक रविवारी (ता. 8) सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनर व आयशर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले.

अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहने अक्षरशः चक्काचूर झाली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देविदास शिवाजी राठोड (वय 50, रा. सुपा, जि. परभणी) हे आयशर वाहन क्रमांक एम.एच. 04 एमआर 7042 ने बिडकीनहून चाकण (पुणे) येथे जात होते. तर नागेश नामदेव सरडे (वय 27, ह.मु. बिडकीन) हे आयशर वाहन क्रमांक एम.एच. 20 ईएल 9406 ने मुक्तेश्वर साखर कारखान्याकडून बिडकीनच्या दिशेने येत होते. दोन्ही वाहने शिवपूर शिवारात महामार्गावर समोरासमोर येताच त्यांची जोरदार धडक झाली.

या धडकेत वाहनांचे पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाले. दोन्ही चालक केबिनमध्ये अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, उपपोलीस निरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, पांडुरंग शेळके यांच्यासह स्थानिक नागरिक संतोष दुबिले, भरत काळुंखे, कारभारी दुबिले, आनंदा निकम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठ्या अथक प्रयत्नांनंतर चालकांना वाहनांच्या केबिनमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले.

अपघातात सहभागी दोन्हीही वाहने अवजड असल्याने आणि रस्त्याच्या मधोमध अडकून पडल्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. वृत्त लिहीपर्यंत वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, इसारवाडी फाटा-बिडकीन महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!