April 23, 2026 5:56 pm

*सावंगीत १८ वर्षीय नक्षत्राच्या आत्महत्येने समाज हादरला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वर्धा जिल्ह्यालगत असलेले सावंगी मेघे हे गाव वैद्यकीय शिक्षण व संस्थांमुळे ओळखले जाते. मात्र आता हेच गाव एका हृदयद्रावक आणि समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेमुळे चर्चेत आले आहे. उच्च शिक्षित डॉक्टर कुटुंबातील १८ वर्षीय मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्याच वडिलांविरोधात गंभीर आरोप नोंदवण्यात आले असून, या घटनेने कौटुंबिक आणि मानसिक छळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

या प्रकरणी नक्षत्रा अरुण वानखेडे (वय १८) हिची आई डॉ. सौ. सुषमा अरुण वानखेडे यांनी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, नक्षत्राचे वडील डॉ. अरुण वानखेडे हे संशयी स्वभावाचे होते आणि त्यांनी सातत्याने आपल्या मुलीचा मानसिक छळ केला. “तू माझी मुलगी नाहीस”, “तू पापाचे फळ आहेस”, “तू आमच्या घरावरचा कलंक आहेस”, “तू मरून जा” अशा अमानवी आणि अपमानास्पद शब्दांत नक्षत्राला वारंवार हिणवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. केवळ शब्दांनीच नव्हे तर वागणुकीतूनही तिला मानसिक त्रास दिला जात होता.

या सततच्या मानसिक छळाला कंटाळून अखेर नक्षत्रा हिने टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजता ते ६ डिसेंबरच्या पहाटे दरम्यान तिने आत्महत्या केली. तपासात नक्षत्राने हेलियम गॅस सिलेंडरच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

ही घटना उघडकीस येताच परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांना हा प्रकार अक्षरशः हादरवून गेला आहे. पतीच्या स्वभावाची आणि मुलीवर होणाऱ्या छळाची जाणीव असलेल्या डॉ. सुषमा वानखेडे यांनी अखेर धैर्य एकवटत पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच सावंगी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंकज वाघोडे, तसेच विशाल डोणेकर आणि सचिन कानडे यांनी तपासावर लक्ष केंद्रित केले. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी वडील डॉ. अरुण वानखेडे हे फरार झाले होते. ते यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सावंगी पोलीस पथकाने उमरखेड येथे धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

वडीलच छळ करणारे आरोपी ठरल्याने ही घटना अधिकच भयावह ठरत आहे. रक्ताचं नातं असलेला बाप आपल्या पोटच्या पोरीचा इतका अमानुष छळ कसा करू शकतो, हा प्रश्न समाजाला अस्वस्थ करून गेला आहे. घरासारख्या सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणीच मुलीला नरकप्राय मानसिक यातना सहन कराव्या लागल्या, हे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.

ही घटना केवळ एक आत्महत्या नसून, कौटुंबिक आणि मानसिक अत्याचाराचा गंभीर इशारा असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत. उच्च शिक्षित, प्रतिष्ठित डॉक्टर कुटुंबात घडलेली ही घटना समाजातील वास्तव अधोरेखित करणारी आहे. सावंगी पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवत आरोपी डॉ. वानखेडे यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे सुतोवाच केले आहे. या घटनेने मुलांवरील मानसिक छळ ओळखून वेळेत हस्तक्षेप करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!