April 23, 2026 5:54 pm

*भंडारा तालुक्यात वाघाची दहशत वाढली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भंडारा जिल्ह्यात सध्या वाघाच्या मुक्त संचारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावागावात आणि शेतशिवारात वाघ दिसत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. मागील काही दिवसांपासून वाघाकडून गोठे आणि गोशाळांमध्ये घुसून पाळीव जनावरांवर हल्ले करण्याच्या घटना सातत्याने घडत असून, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या दहशतीखाली आहेत.

काल भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथे वाघाने एका गाईची शिकार केली. त्याच दिवशी चिखला माईन्स परिसरातील प्रभु बजरंग गोशाळेत घुसून वाघाने एका गाभण गाईवर हल्ला करत तिला ठार केले. विशेष म्हणजे, अवघ्या आठवडाभरापूर्वी याच गोशाळेत वाघाने दोन गायींचा बळी घेतला होता. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

जवाहरनगर परिसरात वाघाचे बस्तान असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वनविभागाने बसवलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात या पट्टेदार वाघाचे स्पष्ट फुटेज मिळाले असून, शिकार केल्यानंतर वाघ पुन्हा त्याच ठिकाणी येऊन शिकार फस्त करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. चिंतेची बाब म्हणजे, वाघ दिसत असलेला परिसर नागरी वस्तीच्या अगदी जवळ आहे.

या भागातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. मात्र, वाघाच्या सततच्या हालचालींमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी रात्री बाहेर पडणे टाळले असून, मुलांच्या सुरक्षेबाबतही पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे. मात्र, ग्रामस्थांनी केवळ इशाऱ्यावर न थांबता वाघाला तातडीने जेरबंद करण्याची, तसेच हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांची त्वरित नुकसान भरपाई देण्याची ठाम मागणी केली आहे.

सतत घडणाऱ्या या घटनांमुळे भंडारा तालुक्यातील जवाहरनगर, चिखला माईन्स परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, वनविभाग पुढे काय पावले उचलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!