विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावरुन उडी मारुन मुलतानी बेकरी व फ्लोअर मिलचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी (वय ५९) यांनी गुरुवारी (ता. ५) दुपारी चारच्या सुमारास आत्महत्या केली.याची नोंद विजापूर नाका पोलिसांत झाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सुनील सदारंगानी हे चार-पाच दिवसांपूर्वी पत्नीसोबत सोलापुरात आले होते. आता ते सोलापुरातच स्थायिक होणार होते. राजकुमार राठी यांचे ते जावई होते. त्यांना दोन मुले असून एक मुलगा अमेरिकेत व दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. अमेरिकेतील मुलगा सोलापूरला यायला निघाला आहे. सदारंगानी यांच्यावर उद्या (शुक्रवारी) सायंकाळी पाच वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. खराडी (पुणे) येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलास घटनेची माहिती कळविण्यात आली. रात्री उशिरा ते सोलापुरात दाखल झाले होते.
आकस्मित मयत म्हणून विजापूर नाका पोलिसांत नोंद झाली आहे. नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर सदारंगानी यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटचे १० मजले पूर्ण झाले असून, सात मजले अर्धवट स्थितीत आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सदारंगानी यांनी गाडी पनाश अपार्टमेंटच्या उघड्या गेटमधून आत नेली. गाडी तेथे थांबवून ते अपार्टमेंटच्या शेवटच्या मजल्यावर चढले. आत्महत्येसाठी त्यांनी ‘पनाश’ अपार्टमेंटच का निवडले, हे गुलदस्त्यातच आहे.
हात जोडून विचार केला अन्…
सदारंगानी हे पनाश अपार्टमेंटच्या छतावर चढले. काही क्षण हात जोडून विचार केला. तेथेच आडवे झाले. आणि दीड-दोन मिनिटांनी झोपलेल्या स्थितीतच १७ व्या मजल्यावरुन ते स्वत: खाली कलंडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
जिल्ह्यात सुप्रसिद्ध बेकरी, बड्या लोकांसोबत संबंध…
ऐकेकाळी सोलापूर शहर-जिल्ह्यातील प्रत्येकाच्या तोंडात मुलतानी बेकरीचेच नाव होते. त्यावेळी सुनील सदारंगानी यांचे बसणे-उठणे बड्या लोकांसोबत होते. पण, काही वर्षांपूर्वी बेकरी बंद पडली होती आणि ते पुण्यातील खराडीला राहायला गेले. काही वर्षांपासून ते आर्थिक अडचणींचा सामना करीत होते. त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही सुरु होते, असे सदारंगानी यांच्या नातेवाईकांनी, मित्रांनी व पोलिसांना सांगितले.
चारचाकीच्या नंबरवरून नातेवाईकाशी संपर्क
सुनील सदारंगानी हे स्वत:च्या चारचाकीतून पनाश अपार्टमेंटमध्ये गेले होते. आत्महत्येची बाब समजातच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी सदारंगानी यांची चारचाकी तेथे उभी होती. गाडीच्या नंबरप्लेटवरुन सदारंगानी यांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला. त्यांचा मेव्हणा काही वेळात त्याठिकाणी आला होता. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठविला. त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.











