सोलापूर शहरात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती धर्मांतर आणि निकाह लावून देण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी इसराईल अहमद शेख याला न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर एका वकिलासह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून, त्यापैकी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी इसराईल शेख याची आत्या आणि आत्तेभाऊ हे दोघे कलबुर्गी येथून फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
पीडित मुलगी गरीब कुटुंबातील असून तिचे वडील रिक्षा चालक आहेत. पीडिता दहावीत शिक्षण घेत असताना, २०२३ साली इसराईल शेख तिच्या घराजवळ येऊ लागला. तिचा पाठलाग करणे, ती घालते तसेच कपडे परिधान करणे, शाळेपर्यंत मागे जाणे अशा प्रकारांनी त्याने तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यास सुरुवात केली. मोबाईल क्रमांक मिळवून त्याने संपर्क वाढवला.
डिसेंबर २०२४ मध्ये मित्र उजेब उर्फ मोहम्मद हनीफ सादिक शेख याच्या घरी नेऊन इसराईलने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतरही तो सतत भेटीचा तगादा लावत राहिला. पीडितेने नकार दिल्यावर त्याने तिच्या आईच्या मोबाईलवर फोन व संदेश पाठवण्यास सुरुवात केली. संशय आल्यावर वडिलांनी चौकशी केली असता, पीडितेने संपूर्ण प्रकार उघड केला. यानंतर कुटुंबाने घर बदलले.
शिक्षण सुरू असतानाही छळ सुरूच
यानंतर पीडितेने ‘जेईई’ परीक्षेत चांगले गुण मिळवून अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. मात्र कॉलेजमध्ये असतानाही इसराईलने तिला सोडले नाही. वर्गातील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवरून संपर्क साधत, सप्टेंबर २०२५ मध्ये उजेबच्या मदतीने पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. यावेळी अत्याचाराचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला विवाहासाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्यात आले.
भीतीपोटी आणि दबावाखाली पीडितेला घेऊन इसराईल व उजेब कलबुर्गीला पळून गेले. मात्र पोलिसांनी शोध घेऊन दोघांनाही सोलापुरात आणले.
‘धर्मांतराशिवाय विवाह मान्य नाही’ – वकिलाचा धक्कादायक सल्ला
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, डिसेंबर २०२५ मध्ये इसराईलने पीडितेला शहर काझी कार्यालयात नेले. तेथे वकील अब्दुल्लाह सलीम खतीब याने धर्मांतर केल्याशिवाय विवाह कायदेशीर ठरणार नाही, असे सांगितले. त्यानंतर स्टॅम्प पेपरवर मजकूर टाईप करून पीडितेकडून जबरदस्तीने स्वाक्षरी करून घेण्यात आली. तिचे नाव बदलून ‘आयेशा शेख’ ठेवण्यात आले आणि निकाह लावण्यात आला.
यानंतर “एक महिना सोलापुरात राहू नका” असा सल्ला देत पीडितेला कलबुर्गीला नेण्यात आले, असेही फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणाकोणावर गुन्हे दाखल?
पीडितेच्या तक्रारीवरून खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे :
इसराईल अहमद शेख (मुख्य आरोपी)
उजेब उर्फ म. हनीफ सादिक शेख (मित्र)
अब्दुल्लाह सलीम खतीब (वकील – धर्मांतराचा सल्ला देणारा)
फिरोज
फिरोजची आई
या आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाने मुख्य आरोपीस पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपासाची दिशा
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल राजगुरू करीत आहेत. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, तर सरकारतर्फे ॲड. दत्तूसिंग पवार काम पाहत आहेत.










