पुण्यात सायबर चोरट्यांकडून वयोवृद्धाला तब्बल १० कोटी ७५ लाख रुपयांचा चुना लावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सायबर चोरट्यांनी “वर्चुअल कोर्ट” तयार करत ज्येष्ठ नागरिकाला धमकावून कोट्यवधी रुपये लुटले.
या चोरट्यांनी देशभरात गाजलेल्या जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचे नाव निष्पन्न झाल्याची धमकी देत सेवा निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढले आणि लुटले. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून सायबर पोलिस ठाण्यात आता अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २३ जानेवारी ते ३१ जानेवारी रोजी घडला. ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे पुण्यातील उच्चभ्रू अशा भांडारकर रोड परिसरात राहायला असून सेवानिवृत्त आहेत. २३ जानेवारी रोजी संबंधित फिर्यादी यांना एका अनोळखी नंबर वरून फोन आला. यावेळी, “तुमचं नाव देशभरात गाजलेल्या जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचे नाव निष्पन्न झालं आहे. तुमच्या आधार कार्ड वरून तुमचे एका बँकेत खातं आहे आणि त्यातून तुम्ही गैरव्यवहार केले आहेत,” अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली.
यापुढे सायबर चोरट्यांनी आणखी एकदा फोन करून फिर्यादी यांना सांगितले की, “तुमच्या आधार कार्ड वरून २४ विविध बँक खात्यांना पैसे ट्रान्स्फर आले आहेत आणि या सगळ्या व्यवहाराचा तपास सी बी आय करत आहे. त्यामुळे तुम्हाला ७ ते ९ वर्ष कारावास होऊ शकतो.” यावरच न थांबता सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना त्यांच्या पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती मागवली. दबावाखाली फिर्यादी यांनी सगळी माहिती सायबर चोरट्यांना दिली.
पुन्हा एकदा फिर्यादी यांना एक फोन आला यावेळी, “मी सी बी आय ऑफिसर बोलत असून तुम्हाला जर यातून सुटका करायची असेल तर ऑनलाईन कोर्टात तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित राहावं लागेल”, असं सांगितलं. तसंच या संपूर्ण घटनेबाबत कुटुंबातील कुठल्या ही सदस्याला सांगू नका अशी धमकी दिली.
२४ जानेवारी रोजी फिर्यादी यांना व्हिडिओ कॉल आला. यावेळी त्यांनी तो उचलल्यावर त्यांच्या समोर सायबर चोरट्यांनी एक वर्चुअल कोर्ट तयार केलं होत. यावेळी एक जण न्यायाधीश म्हणून बसला आणि त्यांनी फिर्यादी यांना काही प्रश्न विचारले तसच आम्ही तुम्हाला वकील देत आहोत असं सांगितलं. यावर त्या वकिलाने व्हिडिओ कॉल वरून फिर्यादी यांना त्यांच्या बँक खात्याची आणि इतर माहिती मागितली. या “वकिलाने” फिर्यादी यांना त्यांच्या बँक आणि एफ डी मधील रक्कम ७ वेगवेगळ्या बँकेत ट्रान्स्फर करायला लावली. फिर्यादी यांनी १० कोटी ७५ लाख रुपये ७ वेगळ्या खात्यावर ट्रान्स्फर केले.
दबावाखाली फिर्यादी यांनी ही सगळी रक्कम सांगितल्या गेल्या बँक खात्यावर पाठवल्यानंतर व्हिडिओ कॉल वर असणाऱ्या सायबर चोरट्यांनी “तुम्ही हा फोन ठेवा तुमची सुटका झाली आहे. आता तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांगू शकता” असं सांगीतलं आणि फोन ठेऊन दिला. फिर्यादी यांनी घडलेला प्रकार त्यांच्या मुलीला सांगितला. हा सगळा प्रकार सायबर फसवणुकीचा असल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी अधिक तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.











