April 23, 2026 9:50 pm

*मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याची गंभीर घटना घडल्याने गेल्या चार तासांपासून महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. टँकरमधून गॅसची गळती सुरू असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तातडीने थांबवण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा गॅस टँकर आडोशी बोगद्याच्या परिसरात अचानक उलटला. अपघातानंतर टँकरमधून गॅस लीक होऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ द्रुतगती महामार्गावरील वाहतूक रोखली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन दल तसेच संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळती थांबवण्यासाठी केमिकल तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून, टँकर सुरक्षितपणे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गॅस गळती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक वाहनचालकांना तासन्‌तास खोळंबा सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग म्हणून सध्या जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरून बोरघाटमार्गे खोपोलीकडे हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे.

या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!