वाहतूक पोलिसांनी दंड केल्याच्या रागातून दोन संशयितांनी थेट एक्स्लो पॉईंट येथील वाहतूक पोलिस चौकीवर दगडफेक करत पोलिसांना उघड आव्हान दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या १२ तासांत दोघा संशयितांना अटक करून त्यांना गजाआड केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शमसुद्दीन नसरुल्लाह शहा (वय ५२, रा. गजानन अपार्टमेंट, चुंचाळे गाव) आणि संतोष मनिराम सरोज (वय ३४, रा. यशोदा अपार्टमेंट, संजीवनगर, अंबड-लिंक रोड) अशी आहेत.
शहर वाहतूक शाखेतील हवालदार काका तुकाराम काळे (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. १) दुपारी सुमारे चार वाजता ते अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट वाहतूक पोलिस चौकीत कर्तव्य बजावत होते. त्याच वेळी अचानक चौकीच्या खिडकीची काच फुटल्याचा मोठा आवाज झाला. काही क्षणांतच चौकीवर जोरदार दगडफेक सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी चौकीवर तसेच बाहेर आलेल्या हवालदार काळे यांच्यावर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दगडफेक केल्यानंतर दोन्ही संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
दंडात्मक कारवाईचा राग कारणीभूत
द्वारका सर्कल आणि एक्स्लो पॉईंट परिसरात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. या दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संशयितांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती. त्याच रागातून, मद्याच्या नशेत असताना मोपेडवरून (एमएच १५ एचपी २९९३) जात असताना त्यांनी एक्स्लो पॉईंट पोलिस चौकीसमोर येऊन दगडफेक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हे शाखेची जलद आणि अचूक कारवाई
या गंभीर घटनेचा समांतर तपास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने हाती घेतला. प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी यांच्यासह हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, महेश खांडबहाले, तेजस मते आणि जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने तब्बल आठ ते दहा किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित पाथर्डी फाटा–अंबडगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ६० हजार रुपये किमतीची मोपेड (एमएच १५ एचपी २९९३) जप्त करण्यात आली आहे.
घटनेनंतर अवघ्या १२ तासांत आरोपींना अटक करून पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिद्ध करत, कायदा हातात घेणाऱ्यांना ‘कायद्याचा बालेकिल्ला’ दाखवून दिला आहे. या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.











