पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने आयटीतील हिंजवडी, माण, मारुंजीसह नेरे, कासारसाई परिसरातील काही प्रमुख रस्त्यांचे ‘भाग्य’ उजळले. वर्षानुवर्षे खड्डे, तडे आणि धुळीने त्रस्त असलेले रस्ते गुळगुळीत झाल्याने आयटीयन्ससह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मात्र, स्पर्धा मार्गाखेरीज अन्य रस्त्यांवर साधे डांबर देखील ओतण्यात आले नाही. संपूर्ण आयटी परिसरात हा विरोधाभास दिसून येत आहे.
आयटी पार्क फेज तीन माण येथील टीसीएस सर्कल ते बापूजी बुवाच्या खिंडीपर्यंत सुमारे पाच किमी तसेच कासारसाई ते लक्ष्मी चौक, भूमकर चौक, डांगे चौक, काळा खडक, दत्तनगर, चिंचवड जकात नाका, वाल्हेकरवाडी, आकुर्डी या परिसरातील रस्त्यांचे अक्षरश: चित्र पालटले आहे. स्पर्धेपूर्वी हिंजवडी आयटीतील लक्ष्मी चौक, हिंजवडी रस्ता, भूमकर चौक रस्ता, मेगापोलिस ते माण या मार्गांवर मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी आणि वाहतुकीचा खोळंबा नेहमीचा झाला होता. पावसाळ्यात वाहनचालकांना अपघाताचा धोका तर पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आयटी पार्क परिसरातील एक रस्ता वगळता अन्य रस्ते जुनेच आहेत. केवळ सायकल स्पर्धा जेथून जाणार आहे. तेवढेच रस्ते चकाचक झाल्याचेही वास्तव आहे.
नव्याने डांबरीकरण
पुणे ग्रँड टूरच्या मार्गाचे सुमारे ४८ ते ५२ किमी लांबीचे रस्ते नव्याने डांबरीकरण करून दुरुस्त करण्यात आले. रस्त्यांच्या कडेला पांढऱ्या पट्ट्या, रिफ्लेक्टर, गतिरोधकांची दुरुस्ती आणि सायकल ट्रॅकची स्पष्ट मार्किंग करण्यात आली.
यंत्रणांचा समन्वय
रस्ते दुरुस्तीच्या कामात पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), एमआयडीसी, तसेच पिंपरी चिंचवड महापालिका यांचा समन्वय साधण्यात आला. वाहतूक पोलिस आणि आयोजक संस्थांनीही मार्ग नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उच्च दर्जाच्या बिटुमिनस मिश्रणाचा वापर करून रस्ते करण्यात आले असून अंदाजे ७० ते ८० कोटी रुपये खर्च झाला आहे. योग्य देखभाल झाली, तर हे रस्ते पाच ते सात वर्षे टिकतील.
एकाच ठिकाणी विरोधाभास
सायकल स्पर्धेचा मार्ग वगळता अन्य रस्त्यांकडे साधे डांबर देखील ओतण्यात आले नाही. संपूर्ण आयटीत परिसरात हा विरोधाभास आहे. लक्ष्मी चौकासह काही चौकात एका बाजूला रस्ता गुळगुळीत दुसऱ्या बाजूला खड्डेच खड्डे, अशी विदारक अवस्था आहे.
आंतरराष्ट्रीय सायकल ट्रॅकसाठी जसा दर्जेदार रस्ता तयार केला आहे, तसाच दर्जा हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांनाही मिळायला हवा. आयटी क्षेत्रातही यूएस, यूकेसह विविध देशांतील नागरिक येत असतात. त्यामुळे हिंजवडीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते असणे अपेक्षित आहे.
– आनंद चौगुले, सदस्य, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज
दररोजचा प्रवास आता सुखकर झाला आहे. मात्र, अन्य रस्त्यांचेही याच धर्तीवर कामे करावीत तसेच ही गुणवत्ता स्पर्धेनंतरही टिकली पाहिजे, एवढीच अपेक्षा.
– ज्ञारेंद्र हुलसुरे, आयटी कर्मचारी
रस्ते एवढे चकाचक आणि गुळगुळीत होत असतील, तर दरवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन करावे. झालेले हे काम तात्पुरते न ठरता कायमस्वरूपी ठेवावे. रस्त्यांबरोबरच गटारे, पदपथ आणि सायकल मार्ग यांच्यावरही लक्ष द्यावे.
– विक्रम विनोदे, रहिवासी, वाकड
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्यासाठी हिंजवडी आयटी आणि परिसरात आमच्याकडून तब्बल १७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे झाली असून त्यासाठी सुमारे ३४ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. या रस्त्यांच्या कामासाठी पीएमआरडीए, महापालिका व एमआयडीसी यांचा देखील सहभाग होता. आयटीतील अन्य रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे वारंवार व गरजेनुसार सुरू असतातच. भविष्यातील तरतुदीनुसार वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातील.
– संकेत साळुंखे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पौड











