राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी बारामती वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. याठिकाणी अजित पवार यांचे पार्थिव काहीवेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अजित पवार यांनी याच काटेवाडी येथील घरात आपला बहुतांश काळ घालवला आहे. ते सणावाराच्या दिवशी याठिकाणी येऊन आपल्या आप्तेष्टांसोबत सण साजरे करायचे. यामुळे अजित पवार आणि काटेवाडी येथील ग्रामस्थांची नाळ एकमेकांशी जुळली होती. त्यामुळे अजित पवार यांचे अंत्यदर्शन घ्यायला आज काटेवाडीच्या ग्रामस्थांनी निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती.
अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतून रुग्णवाहिकेत चढवले तेव्हा येते उपस्थित असलेल्या ग्रामस्थांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला. हे सर्वजण अक्षरश: ओक्सोबोक्शी रडत होते. ‘ओ थांबा ना… आमच्या दादांना नका नेऊ ना… पाया पडतो तुमच्या’, अशी विनंती हे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ करत होते. काटेवाडीतील महिलाही अजितदादांना शेवटचा निरोप देताना प्रचंड रडत होत्या. आमचा दादा महाराष्ट्राचा वाघ होता. आम्ही बहिणी अजितदादाला सलाम करतो, असे बोलताना या महिला रडत होत्या.
अजित पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याठिकाणी बडे राजकीय नेते दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हजारो लोकांनी गर्दी केली आहे. अजित पवार यांंच्या पार्थिवाला 11 वाजण्याच्या आसपास मुखाग्नी दिला जाईल. अजित पवार यांच्या जाण्याने बारामती आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा नियतीने महाराष्ट्रावर केलेला मोठा आघात असल्याची भावना जनमानसातून व्यक्त होताना दिसत आहे.











