मागील दहा दिवसांपासून बेपत्ता असलेले उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याणमधील चार बेपत्ता नगरसेवक शोधण्याची मोहीम ठाकरे गटाच्या कल्याणमधील शिलेदारांनी सुरू केली आहे. या शिलेदारांनी मागील दोन दिवसात नाशिक, इगतपुरी, सिन्नर, घोटी परिसरातील अनेक हाॅटेल्स पालथी घातली, पण त्यांना कोठेही आपले बेपत्ता नगरसेवक आढळले नाहीत. हे चारही नगरसेवक ठाण्यातील एका सत्ताधारी पक्षातील माजी नगरसेवकाच्या भावाने नाशिक परिसरात आपल्या रखवालीत ठेवले असल्याची खात्रीलायक माहिती मंगळवारी सकाळी ठाकरे गटाच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांना मिळाली आहे.
ठाण्यातील या ‘राम’धारी लोकप्रतिनिधीच्या भावाची नाशिक परिसरात नियमित उठबस असते. ठाण्यातील हा लोकप्रतिनिधी मूळचा जुन्नर परिसरातील रहिवासी आहे. या माजी नगरसेवकाच्या भावाने जुन्नर परिसरात न जाता नाशिक परिसरात या नगरसेवकांना नेले असल्याची खात्रीलायक माहिती ठाकरे गटाच्या कल्याणमधील नगरसेवकांना ठाण्यातील खास विश्वसनीय सुत्राने दिली आहे.
पुन्हा शोध मोहीम
ठाकरे गटाचे कल्याणमधील जिल्हाप्रमुख शरद पाटील, माजी शहरप्रमुख सचिन बासरे, सुधीर बासरे, जिल्हा संघटक अभिजीत सावंत आणि साथीदार मिळणाऱ्या माहितीवरून आपल्या परिसरात आपले नगरसेवक शोधण्याची मोहीम राबवत आहेत. या पक्षाचा स्थानिक बलदंड नेता मात्र सुशेगात आहे. बासरे आणि सहकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर नाशिक, सिन्नर, घोटी, इगतपुरी परिसरातील हाॅटेल्स, ढाबे, निवासीगृहांमध्ये जाऊन बेपत्ता नगरसेवकांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कोठेही आपले बेपत्ता नगरसेवक आढळले नाहीत.
शिंदे गटाचा मुक्काम
इगतपुरी परिसरातील मानस हाॅटेलच्या मागील जंगल भागात असलेल्या एका सर्वसुविधायुक्त हाॅटेलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण, डोंबिवलीतील ५३ नगरसेवक गुप्तरितीने गेल्या गुरूवारी ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी एकही नगरसेवकाला बाहेर जाण्याची किंवा मोबाईल सुरू करण्याची मुभा नाही. कडक तैनातीत हे नगरसेवक आहेत. या परिसरात किंवा या नगरसेववकांच्या ताफ्यात आपले नगरसेवक आहेत का याचा शोध मंगळवारी दिवसभर ठाकरे गटाचे सचिन बासरे आणि साथीदार घेणार आहेत.
बेपत्ता फलक
ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेवकांच्या प्रतिमा कल्याण शहर परिसरात रस्ते, चौकांमध्ये लावण्यात आल्या आहेत. समाज माध्यमांमध्ये या नगरसेवकांची नावे झळकत आहेत. त्यामुळे या नगरसेवकांची ओळख लपविण्यासाठी त्यांची विशेष खबरदारी घेण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी घेत असल्याचे समजते. ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आपला पालिकेतील संख्याबळाचा आकडा वाढविण्यासाठी बेपत्ता केले असल्याची चर्चा कल्याण, डोंबिवलीत आहे. हे नगरसेवक कोठे देवदर्शनाला गेले असतील, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक घेत आहेत. मधुर म्हात्रे यांचे वडिल उमेश म्हात्रे यांनी आपला मुलगा देवदर्शनासाठी गेला आहे. तो दोन दिवसात परत येईल असे माध्यमांना सांगितले आहे.
परतीसाठी नगरसेवक आतुर
ठाकरे गटाचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी पळवून नेलेले नगरसेवक आपले नगरसेवक पद रद्द होईल या भीतीने परत आपल्या ठाकरे गटात परतीसाठी खूप इच्छुक असल्याची माहिती ठाण्यातील एका विश्वसनीय सुत्राने कल्याणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. ॲड. कीर्ति ढोणे, मधुर म्हात्रे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता आहेत.











