पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वीकृत नगरसेवकांचा कोटा निश्चित झाला असून, भाजपच्या वाट्याला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेसला एक अशा एकूण दहा जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र भाजपकडील सात जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षात पुन्हा एकदा तारेवरची कसरत सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल ४६ उमेदवार पराभूत झाले होते. त्यापैकी अनेक उमेदवार आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी प्रयत्नशील असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यासाठी रांग लागल्याचे चित्र आहे. एकीकडे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले कार्यकर्ते आणि दुसरीकडे पराभूत उमेदवारांना संधी द्यावी की नाही, यावरून भाजपमध्ये मतभेदाचे सूर उमटताना दिसत आहेत.
मोहोळ ठाम – पराभूतांना स्वीकृतपद नाही
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या वार्तालापात स्वीकृत नगरसेवकपदाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “पराभव झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवकपद देण्यात येणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. स्वीकृतपदासाठी इच्छुकांची संख्या २० ते २५ इतकी असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
मोहोळ यांच्याकडे स्वीकृतपदी वर्णी लागावी, यासाठी सातत्याने संपर्क केला जात असून, या इच्छुकांना तोंड देताना त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानीही इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
अडीच वर्षांचा फॉर्म्युला चर्चेत
भाजपकडे सात स्वीकृत जागा असून, अडीच-अडीच वर्षांसाठी एक-एक उमेदवाराला संधी देण्याचा फॉर्म्युला चर्चेत आहे. या पद्धतीने एका पंचवार्षिक कालावधीत सुमारे १४ जणांना संधी देता येईल, अशी गणिते मांडली जात आहेत. मात्र हा फॉर्म्युला प्रत्यक्षात अमलात येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारीवेळीची कसरत पुन्हा
महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपकडून तीन हजारांहून अधिक अर्ज खरेदी करण्यात आले होते. त्यापैकी १८००हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. मात्र १६५ जागांसाठी उमेदवारी देताना पक्षाला मोठी कसरत करावी लागली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना पक्षात निर्माण झाली होती.
त्या वेळी सुमारे १०० हून अधिक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली जाईल, असे सूतोवाच करण्यात आले होते. तसेच अनेकांना प्रभागनिहाय प्रचारासाठी समन्वयक म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता हेच इच्छुक स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत.
भाजपसमोर पुन्हा आव्हान
स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीतून पक्षांतर्गत नाराजी टाळणे, निष्ठावंतांना न्याय देणे आणि संघटनात्मक समतोल राखणे, असे त्रिसूत्री आव्हान भाजपसमोर उभे आहे. या प्रक्रियेत चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची भूमिका निर्णायक ठरणार असून, अंतिम निर्णय काय होतो, याकडे पुण्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.











