वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे
वाई एमआयडीसी परिसरातील अनेक खासगी कंपन्या व ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांची नेमणूक करण्यात येत असून, यामुळे स्थानिक मराठी कामगारांवर गंभीर अन्याय होत असल्याचा आरोप शिव कामगार सेनेने केला आहे. या संदर्भात शिवसेना (शिव कामगार सेना) जिल्हाध्यक्ष योगेश आनंदराव फाळके यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक कंपन्या परप्रांतीय कामगारांना कामावर ठेवताना त्यांना पी.एफ. (Provident Fund), ई.एस.आय. (ESI) यांसारख्या कायदेशीर सुविधा देत नाहीत. यामुळे संबंधित कंपन्या व ठेकेदारांना आर्थिक फायदा होत असून, कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत आहे.
दुसरीकडे स्थानिक कामगार उपलब्ध असतानाही त्यांना डावलून परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात असल्याने स्थानिक युवक बेरोजगार राहत आहेत. यामुळे परिसरात सामाजिक असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी परप्रांतीय कामगारांची योग्य नोंद, ओळखपत्रे, पोलिस पडताळणी, राहण्याची व्यवस्था व कायदेशीर कागदपत्रांची तपासणी होत नसल्याची गंभीर बाबही निदर्शनास आणून देण्यात आली आहे. शिव कामगार सेनेने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, वाई एमआयडीसी परिसरातील सर्व कंपन्या व ठेकेदारांची सखोल चौकशी करण्यात यावी. परप्रांतीय कामगारांना पी.एफ., ई.एस.आय.
व इतर कायदेशीर सुविधा दिल्या जात आहेत की नाहीत, याची तपासणी करावी. कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच स्थानिक कामगारांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवावा. दरम्यान, योगेश फाळके हे मागील अनेक वर्षांपासून कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत असून, विविध उद्योग क्षेत्रातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रशासन, कंपन्या व ठेकेदारांशी संवाद साधत असतात. पी.एफ., ई.एस.आय., वेतन थकबाकी, कामगार कपात, सुरक्षितता यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी अनेक वेळा यशस्वी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे कामगार वर्गात त्यांच्याबद्दल मोठा विश्वास आणि आदर निर्माण झाला असून, ‘कामगारांचा खरा आवाज’ म्हणून त्यांची ओळख आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिव कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश फाळके यांनी व्यक्त केली आहे.











