प्रतिनिधी : संदेश चव्हाण
भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या विविध क्रीडा प्रोत्साहन योजनांच्या अंतर्गत खेलो इंडिया नॅशनल कलारीपयट्टू लीग २०२६चे आयोजन करण्यात येत आहे. प्राचीन भारतीय युद्धकलेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही लीग राबविण्यात येत असून, स्पर्धा इंडियन कलारीपयट्टू फेडरेशन (IKF) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या मान्यता व देखरेखीखाली आयोजित केली जात आहे. देशातील १९ राज्यांमध्ये सध्या या स्पर्धेसाठी तयारी व सराव शिबिरे सुरू असून, लीगमध्ये एकूण ८ प्रमुख स्पर्धात्मक प्रकारांचा समावेश आहे.
या स्पर्धेत १४ ते १८ वयोगटातील (अंडर-१८) मुले व मुली सहभागी होणार आहेत. संबंधित राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंनाच या राष्ट्रीय लीगसाठी पात्रता देण्यात आली आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून रोख बक्षिसे, पदके व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. ही प्रतिष्ठित राष्ट्रीय लीग १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी SAI – लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (LNCPE), प्रादेशिक केंद्र, तिरुवनंतपुरम (केरळ) येथे होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम तयारीचे नेतृत्व इंडियन कलारीपयट्टू फेडरेशनचे सचिव जनरल डॉ. अंबू आर.
नायर करत आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ८ गुणवान खेळाडूंची निवड करण्यात आली असून, ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद आहे.
निवड झालेले खेळाडू –
मुले : • ओम ज्ञानेश्वर घोडके • मयूर विकास शिरगिरे • श्रेयश सखाराम चव्हाण • शिवदत्त जगतपती सिंग
निवड झालेल्या खेळाडू –
मुली : • साक्षी लालचंद सैनी • राजनंदिनी अशोक गोरे • वेदिका ज्ञानेश्वर तांबे • वेदिका नितीन निकम
महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री. निलेश ए. वालिंबे, सचिव – मराठी कलारीपयट्टू असोसिएशन, महाराष्ट्र, काम पाहणार आहेत. महाराष्ट्रातील या खेळाडूंची निवड ही राज्यातील कलारीपयट्टू प्रशिक्षणाची उंचावलेली गुणवत्ता व वाढता दर्जा दर्शविते. मराठी कलारीपयट्टू असोसिएशनने सर्व निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











