मुंबई : शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवार आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती लपवली आहे, असा आरोप करणारी याचिका सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. शिवसेनेच्या (शिंदे) प्रवक्त्या सुशी शहा यांनी ही याचिका केली. मात्र निवडणूक तीन दिवसांवर आल्याने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे पेडणेकर यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहा यांनी पेडणेकर यांच्या उमेदवारी अर्जाला आव्हान दिले आहे. तसेच पेडणेकर यांनी त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती हेतुपुरस्सर दडपल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. शहा यांचे वकील कल्पेश जोशी यांनी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सोमवारी ही याचिका सादर केली व याचिकेवर तातडीच्या सुमावणीची मागणी केली. तथापि, निवडणूक गुरुवारी होणार असल्याकडे लक्ष वेधून न्यायालयाने याचिकेवरील तातडीच्या सुनावणीला नकार दिला. तसेच, निवडणुकीनंतर याचिकेवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.
पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १९९ (मध्य मुंबई) मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, पेडणेकर यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे, त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बेकायदेशीर, अवैध आणि अयोग्य घोषित करून फेटाळण्याचे आदेश देण्याची मुख्य मागणी शहा यांनी केली.
याचिकेनुसार, पेडणेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांसारखी महत्त्वाची माहिती हेतुपुरस्सर दडपली आहे. पेडणेकर यांच्याविरुद्ध अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात करोना काळातील कथित फसवणुकीच्या प्रकरणाचा समावेश आहे. पेडणेकर यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांची माहिती लपवली आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.
पेडणेकर यांनी खोटा आणि दिशाभूल करणारा उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल करून निवडणूक प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असा दावा देखील शहा यांनी याचिकेत केला आहे.











