नागपूर: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर विभागाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन सादर करण्याच्या उद्देशाने ‘चना पोहा विथ गडकरी’ नावाचा एक विशेष संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच ‘देवाभाऊ विथ तर्रीपोहा’ कार्यक्रम झाला. भारत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. यानंतर आता सोमवार १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता एनआयटी बगीचा सक्करदा येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागरिकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमात सध्या देशभरातील तरुणाईची ‘क्रश’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक गडकरींची मुलाखत घेणार आहे. विविध क्षेत्रांतील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या अनुषंगानं आज नागपुरात ‘तर्री पोहा विथ देवा भाऊ’या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरच्या शाश्वत विकासासाठीचं व्हिजन देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूरकरांच्या समोर मांडले आहे. ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ आगळावेगळा संवाद सोहळ्याचं सूत्रसंचालन प्रसिद्ध हास्य अभिनेता भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले.
गेल्या १० वर्षांत नागपूर शहराचे बदललेले रूप आणि पुढील १० वर्षामध्ये होणारा विकास यावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने एक एक प्रकल्पांची मांडणी केली. येत्या काही वर्षांत नागपूर जगातील टॉप शहरांच्या यादीत सर्वात उठून दिसेल, असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. नागपूरची संस्कृती आहे आणि त्याच संस्कृतीत मी मोठा झालो आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठं गेलो तरी नागपूरचं आकर्षण हे असतं. त्या नागपूरच्या संस्कृतीची एक त्याची आवड असते. नागपूरबद्दल एक मी महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे शहर खूप मोठे झाले असे फडणवीस यांनी सांगितले होते. यानंतर आता नितीन गडकरींचाही ‘चना पोहा विथ गडकरी’ हा कार्यक्रम होणार आहे. फडणवीसांनंतर गडकरीही तसाच काहीचा कार्यक्रम घेत असल्याने विविध राजकीय चर्चाही रंगत आहेत.











