पुणे : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार व लोकनेते तसेच भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना शहरातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुक्रवारी श्रद्धांजली वाहिली. मान्यवरांनी गप्पांमधून या लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.
राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, क्रीडा, कला, चित्रपट, उद्योग अशा विविध क्षेत्रात शहराला उंचीवर नेणारे सुरेश कलमाडी (वय८१) यांचे मंगळवारी निधन झाले. कलमाडी कुटुंबीयांच्या वतीने बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथे शुक्रवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कलमाडी यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली वाहिली. सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी , चिरंजीव सुमीर, सून नंदिता, विवाहित कन्या सोनाली व पायल यांचे मान्यवरांनी सांत्वन केले.
पूना क्लबमधील हिरवळीवरील मांडवामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. फुलांनी सजवलेल्या व्यासपीठावर सुरेश कलमाडी यांची तसबीर ठेवण्यात आली होती. मान्यवरांनी तसबिरीला फुले वाहून आणि
दर्शन घेऊन सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण मांडवात उदबत्तीचा सुवास दरवळत होता. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर सुरेश कलमाडी यांची विविध छायाचित्रे झळकत होती. बालपणातील, तरुणपणातील , राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए), हवाई दलातील, राजकारणातील, पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, क्रीडा स्पर्धा यातील छायाचित्रांनी सुरेश कलमाडी यांच्या जीवनाचा पट यावेळी उपस्थितांसमोर मांडला.
सुरेश कलमाडी यांच्या विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्यामुळे राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, क्रीडा , शिक्षण, आर्थिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील नामवंतांची मांदियाळी येथे जमली होती. सुरेश कलमाडी यांनी नावीन्याचा ध्यास घेऊन शहराचा केलेला कायापालट, शहरात राबवलेल्या विविध योजना, गणेशोत्सवातील पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव , पुणे व्यासपीठ अशा कलमाडी यांच्या कल्पकवृत्तीला पुणेकरांनी नमन केले.
सुरेश कलमाडी हे उत्तम क्रीडा संघटक होते. पुणे शहरात सुरू केलेली मॅरेथॉन त्यांनी जागतिक पातळीवर नेली. पुण्यातील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे तसेच दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे त्यांनी केलेले दिमाखदार आयोजन या आठवणींना क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उजाळा दिला.











