भारताने वर्ल्डकप जिंकला तर मी गाणं म्हणेन आणि जेमिमा गिटार वाजवेल असं प्रॉमिस महान खेळाडू आणि भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिलं होतं. भारतीय संघाने २ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला नमवत पहिल्यावहिल्या वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं. विजयानंतर जेमिमा मुलाखती, बिग बॅश लीग, श्रीलंका दौरा, ब्रँडिगचे कार्यक्रम, सत्कार यात व्यग्र होती. अखेर शुक्रवारी गावस्कर आणि जेमिमाची भेट झाली.
गावस्कर यांनी जेमिमाची भेट घेतली. तिला बॅटच्या आकाराची गिटार भेट दिली. तुम्ही तिचे अनावरण करा असं जेमिमा म्हणाली. पण इथे मी सलामीचा फलंदाज नाही, तू आहेस अशी गंमत करत गावस्करांनी जेमिमाला बॅटच्या आकाराची गिटार भेट दिली. जेमिमा या गिफ्टने प्रचंड खूश झाली. जेमिमाने या बॅटरुपी गिटारसह छानशी पोझही दिली.
ये दोस्ती हम नही तोंडेंगे, तोडेंगे दम मगर या शोलेतल्या जयवीरुवर चित्रित झालेल्या खास गाण्यावर गावस्कर-जेमिमा यांची मैफल रंगली. गावस्कर गाणं म्हणत होते तर जेमिमा बॅटरुपी गिटार वाजवत होती. मैफलीनंतर गावस्कर आणि जेमिमाने बॅटरुपी गिटारसह फोटोशूटही केलं. चाहत्यांनी या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे.ही तर नुसती झलक आहे. गिटारवर अख्खं गाणं लवकरच घेऊन येऊ असं जेमिमाने म्हटलं आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी सुनील गावस्कर यांनी जेमिमा रॉड्रीग्जबरोबर गाणं गाण्याचं वचन दिलं होतं. वर्ल्डकप फायनलच्या पूर्वसंध्येला स्पोर्ट्स टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले होते, “जर भारताने विश्वचषक जिंकला तर ती आणि मी, जर तिला मान्य असेल तर. आम्ही दोघं गाणं गाऊ. तिच्याकडे तिची गिटार असेल आणि मी तिच्यासोबत गाणं गाणार. काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात आम्ही खरंच ते केलं होतं. तिथे एक बँड वाजत होता आणि आम्ही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. ती गिटार वाजवत होती आणि मी गाणं गात होतो. मला ते पुन्हा करायला आवडेल.”
वर्ल्डकप जिंकल्यानंतर जेमिमाने गावसकर यांना अगदी संगीतपूर्ण पद्धतीने त्यांचं वचन पूर्ण करण्याची आठवण करून दिली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर जेमिमाने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत लिहिलं, तुमच्याबरोबर गाणं गाण्यासाठी वाट पाहत आहे. जेमिमा म्हणाली होती, हॅलो सुनील गावस्कर सर, तुम्ही म्हटलं होतं की भारतीय संघाने जर विश्वचषक जिंकला तर आपण दोघं एकत्र गाणं गाऊ. मी गिटार घेऊन रेडी आणि तुम्हीही माईक घेऊन तयार असाल. खूप सारं प्रेम आणि खूप खूप आभार.”











