April 23, 2026 3:45 pm

राज ठाकरे उद्धवजींच्या सापळ्यात अडकलेत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई / छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (मनसे) बाहेर पडून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेले फायरब्रँड वक्ते व प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पक्षाच्या सद्यस्थितीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी केलेल्या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

“ज्या उद्धव ठाकरेंवर आयुष्यभर जहरी टीका केली, त्याच उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरे यांनी आज शरणागती पत्करली आहे. राज ठाकरे उद्धवजींच्या सापळ्यात अडकले असून, त्यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व संपवले आहे,” असा खळबळजनक दावा महाजन यांनी केला.

उद्धव ठाकरेंसमोर मनसेची नांगी टाकल्याचा आरोप

महाजन म्हणाले की, मनसेची संघटना इतकी खिळखिळी झाली आहे की, उद्धव ठाकरेंसोबत जाण्याशिवाय राज ठाकरेंपुढे कोणताही पर्याय उरलेला नाही. “ही युती गरजेपोटी आहे, विचारांची नाही. राज ठाकरे आज स्वतंत्र नेतृत्व न राहता उद्धव ठाकरेंच्या राजकारणात अडकले आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

‘गरुड’ उडून गेले, पक्षात उरली ‘वटवाघळे’

मनसेतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना महाजन यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

“जे उडून गेले, ते गरुड होते. जे आज पक्षात उरले आहेत, ते उडण्याची क्षमता नसलेली वटवाघळे आहेत,” असे म्हणत त्यांनी मनसेतील कार्यकर्त्यांची अवस्था मांडली. पक्षात कर्तृत्ववान, लढाऊ नेत्यांना किंमत राहिलेली नसून, राज ठाकरे यांच्या भोवती केवळ खुशमस्कऱ्यांचे वर्तुळ तयार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

कार्यकर्त्यांचा अपमान, पक्षात अस्वस्थता

मनसेतील अंतर्गत नाराजीवर भाष्य करताना महाजन यांनी संदीप देशपांडे यांचे उदाहरण दिले. “शहराध्यक्ष असूनही त्यांना महत्त्वाच्या वाटाघाटींमधून बाजूला ठेवले जाते, हा अपमान नाही का? संदीप देशपांडे शरीराने मनसेत असतील, पण त्यांचा आत्मा तिथे नाही,” असे विधान करत त्यांनी पक्षातील अस्वस्थतेवर प्रकाश टाकला.

हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप

राज ठाकरे हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेल्याचा आरोप करत महाजन यांनी ९ मार्च रोजी कुंभमेळ्याबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ दिला.“कुंभमेळ्याची थट्टा करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारे हिंदू धर्माची खिल्ली उडवणारे स्वतःला हिंदुत्ववादी कसे म्हणू शकतात?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

निवडणुकीत ‘ड्रॉप’ घेणारा पक्ष मनसेच्या राजकीय रणनीतीवरही महाजन यांनी जोरदार टीका केली.

“निवडणुका आल्यावरच मनसे जागी होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष ‘ड्रॉप’ घेतो. त्यामुळे कार्यकर्त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होते,” असे ते म्हणाले.मराठवाड्यात मनसेची परिस्थिती अत्यंत बिकट असून अनेक ठिकाणी उमेदवारही मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचे कौतुक

शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्यामागील कारण स्पष्ट करताना महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे खुलेआम कौतुक केले.

“एकनाथ शिंदे हे असे नेते आहेत जे रात्री दोन वाजताही कार्यकर्त्यांना भेटतात. अडीच वर्षांत त्यांनी केलेले काम जनतेसमोर आहे. दुसरीकडे मातोश्रीवर केवळ सरंजामशाही चालते,” असा टोला त्यांनी लगावला.

राजकीय वर्तुळात खळबळ

प्रकाश महाजन यांच्या या आक्रमक विधानांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची दिशा काय असेल, ‘ठाकरे ब्रँड’ टिकेल का, आणि महायुतीसमोर मनसेचे स्थान काय राहील, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!