April 23, 2026 3:22 pm

कात्रजमध्ये भाजपचा दमदार दावा; मुख्यमंत्र्यांच्या सभेने ताकद सिद्ध

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे (कात्रज) प्रतिनिधी :
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कात्रज परिसरात आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. पुणे शहरात प्रथमच प्रभाग क्रमांक ३७, ३८, ३९ आणि ४० मधील भाजपा–रिपाइं महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या प्रचारासाठी आमंत्रित करत आपली संघटनात्मक ताकद आणि राजकीय प्रभाव ठळकपणे दाखवून दिला.

कात्रज चौक येथे पार पडलेल्या या जाहीर सभेमुळे संपूर्ण दक्षिण पुण्यातील प्रचाराला नवी दिशा मिळाली आहे. महापालिका निवडणुकीतील ही पुण्यातील पहिलीच मोठी सभा थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाल्याने राजकीय वर्तुळात या सभेची विशेष चर्चा रंगली आहे.

सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “जे लोक आम्हाला कामाचा हिशोब विचारत आहेत, त्यांनी आधी स्वतःचा आरसा पाहावा,” अशा शब्दांत नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. पुण्याच्या सर्वांगीण विकासाचा विडा आपण उचलल्याचे सांगत त्यांनी येत्या पाच वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात पुण्यासाठी सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “अजित पवार अनेक वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते. मग त्यांच्या काळात हा भरीव विकास का झाला नाही?” असा थेट सवाल उपस्थित केला. केवळ टीकेसाठी टीका करणे पुणेकर स्वीकारणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांवर निशाणा साधत, पुणेकर विकासाला प्राधान्य देतात आणि विकासविरोधी राजकारणाला थारा देणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

या सभेत प्रभाग क्रमांक ३८ मधील भाजपा–रिपाइं महायुतीचे उमेदवार व्यंकोजी खोपडे, संदीप बेलदरे, राणी भोसले, प्रतिभा चोरघे आणि अश्विनी चिंधे यांच्या विजयाचा संकल्प व्यक्त करण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक ३७, ३९ आणि ४० मधील उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यासपीठावर माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार माधुरी मिसाळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेमुळे कात्रज व आजूबाजूच्या परिसरात भाजपा महायुतीची ताकद अधोरेखित झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीत दक्षिण पुण्यातील राजकीय समीकरणांवर या सभेचा मोठा प्रभाव पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!