मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी प्रादेशिक उत्कृष्टता केंद्र म्हणून प्रयोगशाळेचे कामकाज; आरकेव्हीवायमधून ८ कोटी ६३ लाखांचा निधी
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी कीटकशास्त्र विभागात अत्याधुनिक कीटकनाशक अवशेष चाचणी व विश्लेषण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच शेतमालातील कीटकनाशक अवशेषांचे अचूक परीक्षण करण्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वाची ठरणार आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १५) दुपारी अडीच वाजता कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (RKVY) या प्रयोगशाळेसाठी ८ कोटी ६३ लाख २ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी ही प्रयोगशाळा प्रादेशिक उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्य करणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी, संशोधक, कृषी विद्यापीठे, शासकीय विभाग, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच निर्यातदारांना कीटकनाशक अवशेष तपासणीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.
शेतमालाची गुणवत्ता तपासण्यास मदत
फळे, भाजीपाला, धान्य, कडधान्ये, तेलबिया यांसह माती, पाणी आणि इतर कृषी नमुन्यांमधील कीटकनाशक अवशेषांचे अत्यंत अचूक आणि विश्वासार्ह विश्लेषण या प्रयोगशाळेत करता येणार आहे. यामुळे शेतमालातील अवशेषांचे प्रमाण निश्चित करण्यास तसेच सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनाला चालना देण्यास मदत होईल.
अवशेषमुक्त कृषी उत्पादनाला प्रोत्साहन देणे, ग्राहकांचा शेतमालावरील विश्वास वाढविणे आणि निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना वैज्ञानिक आधार देणे, हा या प्रयोगशाळेच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तपासणी सुविधा
प्रयोगशाळेला ISO/IEC 17025:2017 मानकांनुसार NABL मान्यता मिळविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यानंतर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार विश्लेषण सेवा उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
प्रयोगशाळेत उच्च क्षमतेची आधुनिक उपकरणे, नमुना प्रक्रिया व्यवस्था, गुणवत्ता नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा तसेच प्रयोगशाळा सुरक्षेच्या आधुनिक उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शेतकरी, संशोधकांना मोठा फायदा
कीटकनाशक अवशेषांचे विश्लेषण करण्याबरोबरच अन्न गुणवत्ता परीक्षण, अवशेष निरीक्षण, रेसिड्यू डिसिपेशन अभ्यास, पर्यावरणीय निरीक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणासाठीही या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील कृषी क्षेत्राला वैज्ञानिक आणि तांत्रिकदृष्ट्या मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाले पिकांवर परिसंवाद
दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने देशी गोवंश, नैसर्गिक शेती व मसाले पीक या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात शुक्रवारी दुपारी हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या परिसंवादात देशी गोवंश संवर्धन, नैसर्गिक शेती पद्धती, मसाला पिकांचे उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन होण्याची अपेक्षा आहे.











