September 6, 2026 1:43 pm

प्रेमसंबंधाच्या संशयातून हिंजवडीत रक्तरंजित थरार; लोखंडी रॉडने तरुणाची हत्या, तरुणी गंभीर जखमी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातील संशयातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. शालेय जीवनापासून प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत असल्याचा संशय मनात धरून संतापाच्या भरात लोखंडी रॉडने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर आरोपीने पंढरपूरच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उरुळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर तातडीने नाकाबंदी करून संशयिताला वाहनासह अटक केली.

शालेय जीवनातील प्रेम, संशयातून घेतला हिंसक वळण

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि संबंधित तरुणी यांच्यात शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढील शिक्षणासाठी दोघेही पुण्यात आले होते.

दरम्यान, पुण्यात शिक्षण घेत असताना संबंधित तरुणीचे तिच्याच शिक्षण संस्थेतील एका अन्य तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय दिनेशच्या मनात निर्माण झाला. या संशयातून त्यांच्यात वाद वाढत गेला.

रागाच्या भरात लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

गुरुवारी (६ ऑगस्ट) दिनेश थेट संबंधित तरुण आणि तरुणी राहत असलेल्या ठिकाणी पोहोचला. तेथे तिघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसाचारात झाले. संतापलेल्या दिनेशने लोखंडी रॉडने दोघांच्या डोक्यावर सपासप वार केले.

या भीषण हल्ल्यात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

नाकाबंदी करून आरोपीला अटक

घटनेनंतर आरोपी दिनेश झांबरे वाहनातून पंढरपूरच्या दिशेने पसार झाला. हल्ल्याची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी केली. संशयित वाहनाचा शोध घेत पोलिसांनी आरोपीला वाहनासह ताब्यात घेतले.

त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि इतर पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू

या प्रकरणी हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, नेमका वाद कशामुळे झाला, आरोपीने हल्ल्याचे पूर्वनियोजन केले होते का, तसेच घटनेमागील इतर कारणांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

प्रेमसंबंधातील संशयातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे हिंजवडी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा वाढत्या हिंसक घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

— समाप्त —

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!