तळेगाव ढमढेरे | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी आणि वृक्षारोपणाची चळवळ अधिक व्यापक व्हावी या उद्देशाने कोंढापुरी (ता. शिरूर) येथील आर. एम. धारिवाल विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज येथे “एक वृक्ष – एक विद्यार्थी” या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना २५० फळझाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
हा उपक्रम आर. एम. धारिवाल विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज, ग्रामपंचायत कोंढापुरी, ग्रामविकास फाऊंडेशन आणि १४ ट्रिज फाउंडेशन (वेताळे, ता. खेड) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ. दिनेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमात इको क्लब फॉर मिशन लाइफ तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रपती पारितोषिक विजेते धनंजय गायकवाड यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. झाडे लावणे आणि ती जगविणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.”
कार्यक्रमात संचालक डॉ. दिनेश डोके, ग्रामपंचायत अधिकारी संतोष डफळ, प्राचार्य आनंदा धोंडे तसेच प्रा. चंद्रकांत भोजने यांनीही पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या फळझाडांची रोपे वितरित करण्यात आली. त्यामध्ये आवळा – ४५, जांभूळ – ५०, आंबा – ४५, पेरू – ३५, फणस – २५ आणि लिंबू – ५० अशी एकूण २५० रोपे देण्यात आली.
कार्यक्रमाला सरपंच संदीप डोमाळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल दिघे, अपेक्षा गायकवाड, बापू खारतोडे, मनोज कोल्हे, राजेंद्र धुमाळ, अश्विनी कोल्हे, रेणुका कोल्हे, करुणा परमार, तेजस्विनी शेळके, वंदना भोजने, सुनील गायकवाड, श्रीकांत गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. कार्तिककुमार सपकाळ यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली. “एक विद्यार्थी – एक वृक्ष” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला असून, भविष्यात अधिक हरित आणि पर्यावरणपूरक समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
— खरा वार्ताहर











