प्रतिनिधी | नासरापूर, दि. १ ऑगस्ट
भोर तालुक्यातील भोंगवली येथे सुरू असलेल्या सोलर वीज उपकेंद्र आणि हाय टेन्शन पॉवर लाईन प्रकल्पावर शुक्रवारी (१ ऑगस्ट) पहाटे अज्ञात ५० ते ६० जणांच्या जमावाने धाडसी हल्ला करत मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात कंपनीची मशिनरी, वाहने, जनरेटर, कार्यालयीन साहित्य आणि इतर उपकरणांचे मोठे नुकसान झाले असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगारांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भोर तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
भोंगवली गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर डोंगराळ परिसरात जवळपास १०० एकर क्षेत्रात सोलर वीज उपकेंद्र आणि हाय टेन्शन पॉवर लाईनचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्थानिक स्तरावर विरोध होत असून, प्रकल्पविरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत प्रकल्पाला विरोध नोंदवला होता. अशा परिस्थितीत ही हिंसक घटना घडल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
मध्यरात्रीचा थरार; मशिनरी, वाहने आणि कार्यालयाची जाळपोळ
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साधारण एक ते दीड वाजण्याच्या सुमारास ५० ते ६० जणांचा जमाव प्रकल्पस्थळी पोहोचला. जमावाने कंपनीच्या जेसीबी, मशिनरी, जनरेटर, वाहने, कार्यालय आणि इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून त्यांना आग लावली. काही वेळातच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हल्लेखोरांनी तेथे राहणाऱ्या कामगारांना लक्ष्य करत त्यांच्याकडील मोबाईल फोन हिसकावून घेत फोडले तसेच अनेकांना मारहाण केली. काही कामगारांच्या अंगावर पेट्रोल किंवा डिझेल टाकून जिवंत जाळण्याचाही प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांच्या हातात तलवारी, कोयते आणि गावठी पिस्तूलसारखी शस्त्रे होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तातडीने धाव
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली.
पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले की, अज्ञात जमावाने कंपनीच्या मशिनरी, कार्यालय आणि वाहनांची जाळपोळ केली असून कामगारांनाही मारहाण करण्यात आली आहे. काही कामगारांनी जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहितीही समोर आली आहे. संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू असून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कंपनीचा मोठा आर्थिक फटका
प्रकल्पाचे व्यवस्थापक सुधीर पिसाळ यांनी सांगितले की, दिवसभर पोलिस बंदोबस्तात काम सुरू असते. मात्र, अधिकारी वर्ग निघून गेल्यानंतर मध्यरात्री मोठ्या जमावाने अचानक हल्ला केला. या घटनेत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानीचा अंतिम पंचनामा सुरू आहे. हल्ल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कामगारांनी रात्रीच प्रकल्प सोडल्याचे त्यांनी सांगितले.
सीसीटीव्हीचे नुकसान; डीव्हीआर पोलिसांच्या ताब्यात
हल्लेखोरांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घटनास्थळी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली. मात्र, काही डीव्हीआर सुरक्षित अवस्थेत मिळाले असून ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
प्रशासनाची पाहणी, चौकशी सुरू
घटनेनंतर भोरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परिसरातील ग्रामस्थांची चौकशी सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत आहे.
तणावपूर्ण वातावरण
भोंगवली येथील प्रस्तावित सोलर प्रकल्पावरून गेल्या काही महिन्यांपासून स्थानिकांमध्ये नाराजी होती. त्यातच झालेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
प्रकल्पावरील हल्ला, मोठ्या प्रमाणावरील जाळपोळ, कामगारांवरील मारहाण आणि जीव घेण्याचा कथित प्रयत्न या सर्व बाबींची पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











