निरगुडसर | प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील वळती-शिंगवे मार्गावरील सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला वळती-मांगीरबाबा ओढ्यावरील पूल अत्यंत जीर्ण आणि वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले असतानाही आजही या पुलावरून दुचाकी, चारचाकी आणि काही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नवीन पुलाच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन १५ मे २०२६ रोजी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी अडीच महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
आंबेगाव तालुक्यातील वळती गावाजवळ शिंगवेकडे जाणाऱ्या मार्गावर, मांगीरबाबा मंदिराशेजारी हा पूल आहे. परिसरातील नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून दररोज शेकडो वाहनांची ये-जा या पुलावरून होत असते. मात्र पुलाची उंची कमी असल्यामुळे मीना नदीला पूर आल्यानंतर हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते आणि नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो.
सध्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पुलाच्या तळभागातील काँक्रीट अनेक ठिकाणी निखळले असून आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. या सळ्यांना मोठ्या प्रमाणात गंज लागल्याने पुलाची मजबुती कमी झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
या पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत ३ ऑगस्ट २०२३ रोजी वळती ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर झालेल्या तांत्रिक पाहणीत हा पूल पूर्णतः जीर्ण व वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आणि नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले. मात्र प्रत्यक्षात या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र असून, आजही वाहनांची सर्रास ये-जा सुरू आहे.
नवीन पुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ मे २०२६ रोजी संबंधित ठेकेदाराला कामाचा आदेश दिला. मात्र अद्याप प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, केवळ वाहतूक बंद करण्याचे आदेश देऊन प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. पुलावर प्रभावीपणे वाहतूक बंद करून तातडीने नवीन पुलाचे काम सुरू करणे आवश्यक आहे.
अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवी मजकुरी यांनी सांगितले की, “वळती-शिंगवे मार्गावरील धोकादायक वळती-मांगीरबाबा पुलाच्या नवीन बांधकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून संबंधित ठेकेदाराला काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल.”











