August 5, 2026 12:54 pm

जय भीम’ हा नारा केवळ एका समाजाचा नाही; तो सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचा घोष आहे – अभिजीत दिपके

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे | प्रतिनिधी

कॉकरोच जनता पार्टी तसेच विविध विद्यार्थी आंदोलनांमुळे चर्चेत आलेले अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीवरील ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व्यापक संदर्भ मांडला. यावेळी त्यांनी ‘जय भीम’ हा नारा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा असल्याचे मत व्यक्त केले.

दिपके म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. भारतीय संविधानाच्या निर्मितीद्वारे त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्यायाचा पाया उपलब्ध करून दिला. महिलांचे अधिकार, शिक्षणाचा हक्क, रोजगाराच्या संधी, कामगारांचे संरक्षण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘जय भीम’ या घोषणेचा अर्थ स्पष्ट करताना दिपके म्हणाले की, हा नारा कोणत्याही एका समाजाचा नसून अन्यायाविरोधात उभे राहणाऱ्या, संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या आणि सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. हा घोष केवळ अभिवादन नसून समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील विविध घटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा स्वीकार केल्यास सामाजिक ऐक्य अधिक दृढ होईल आणि लोकशाही अधिक सक्षम बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आंबेडकरी चळवळीबाबत बोलताना दिपके यांनी कोणत्याही एका नेत्यावर टीका न करता, विविध राजकीय गटांनी डॉ. आंबेडकरांचा वारसा आणि चळवळ मर्यादित चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे व्यापक एकजूट निर्माण होण्यात अडथळे आल्याचे मत व्यक्त केले.

देशात सामाजिक न्याय, लोकशाही आणि संविधानिक मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी सर्व समाजघटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा स्वीकार करून एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन अभिजीत दिपके यांनी यावेळी केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!