रांजणी, प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी व डोंगरी भागाने अक्षरशः हिरवाईची चादर पांघरली आहे. डोंगर-दऱ्या, धुक्याने वेढलेले घाट, पांढरेशुभ्र धबधबे आणि जलाशयांचे मनमोहक दृश्य अनुभवण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. विशेषतः शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून संपूर्ण परिसर पर्यटनाने गजबजून गेला आहे.
डिंभा धरण परिसर, कोंढवळ, गोहे पाझर तलाव, भीमाशंकरचा कडा आणि आहुपे घाट ही ठिकाणे पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगररांगा गर्द हिरवाईने नटल्या असून कड्याकपारीतून कोसळणारे धबधबे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. डिंभा धरणाचा विस्तीर्ण जलाशय, त्यावर पसरलेली धुक्याची दुलई आणि सभोवतालचा निसर्ग पर्यटकांना मोहिनी घालत आहे.
भीमाशंकर आणि आहुपे परिसरातील घनदाट जंगलात फिरण्याचा तसेच पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे. निसर्गरम्य वातावरणात अनेक पर्यटक छायाचित्रण, व्हिडिओ शूटिंग आणि रील्स तयार करण्याचाही आनंद घेत असल्याने या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक व्यवसायांनाही मोठा फायदा होत आहे. स्थानिक आदिवासी युवकांनी सुरू केलेली लहान हॉटेल्स, चहाचे स्टॉल आणि खाद्यपदार्थांची दुकाने ग्राहकांनी फुलून गेली आहेत. गरमागरम भाजलेली मक्याची कणसे, चुलीवर बनविलेले जेवण, पिठलं-भाकरी, रानभाज्या आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी होत असून त्यामुळे अनेक स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
मात्र, पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे डिंभा–भीमाशंकर मार्गासह घाट रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. काही पर्यटक धोकादायक कड्यांवर उभे राहून सेल्फी काढताना तसेच धबधब्यांच्या वेगवान प्रवाहात उतरून जीव धोक्यात घालत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पर्यटकांना विशेष सतर्कतेचे आवाहन केले आहे.
याबाबत आंबेगावचे तहसीलदार राहुल सारंग यांनी सांगितले की, “सध्या पश्चिम डोंगरी भागात मुसळधार पाऊस सुरू असून दरडी कोसळण्याचा तसेच पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याचा धोका कायम आहे. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद जरूर घ्यावा; मात्र कोणताही अतिउत्साह न दाखवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.”
परिसराचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहावे यासाठी सभापती कैलासबुवा काळे यांनीही पर्यटकांना प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर कचरा कुठेही न टाकता स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. “निसर्गाचा आनंद घेताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही प्रत्येक पर्यटकाने पार पाडावी,” असे त्यांनी नमूद केले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भाग पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. मात्र, निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षितता, वाहतूक नियम आणि पर्यावरण संवर्धन यांना तितकेच महत्त्व देण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.











