August 5, 2026 12:51 pm

खानापूर–राजगड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

हॉटेल तिरंगाजवळ खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांची कसरत; शाळकरी मुले आणि कामगारांचा जीव धोक्यात

खानापूर, दि. २८ : खानापूर ते राजगड (पाबे) या महत्त्वाच्या रस्त्यावर खानापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल तिरंगाजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे वाहनचालकांना त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला असून, दुचाकीस्वारांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात खड्डे बुजविण्याचे काम केले जाते; मात्र पावसाळा सुरू होताच पुन्हा रस्त्याची दुरवस्था होते. त्यामुळे केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

१९ नोव्हेंबर २०२५ रोजी खानापूर–राजगड (पाबे) रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र अवघ्या काही महिन्यांतच रस्ता पुन्हा पूर्वीप्रमाणे खराब झाला आहे. दुरुस्तीच्या कामाचा दर्जा तपासला जातो का, संबंधित ठेकेदाराच्या कामावर प्रशासनाचे नियंत्रण आहे का आणि शासनाचा निधी योग्य पद्धतीने वापरला जात आहे का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

हा रस्ता पंचक्रोशीतील अनेक गावांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि शाळकरी मुले दररोज या रस्त्याने प्रवास करतात. रस्ता मुळातच अरुंद असून, त्यात खोल खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे वाहने चालविणे अधिक धोकादायक बनले आहे. रात्रीच्या वेळी तसेच मुसळधार पावसात परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

“दरवर्षी दुरुस्ती करूनही काही महिन्यांतच रस्त्याची पुन्हा दुरवस्था होत असेल, तर संबंधित कामाच्या गुणवत्तेची चौकशी होणे आवश्यक आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का?” असा सवाल मावळा जवान संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तात्या दारवटकर यांनी उपस्थित केला आहे.

ह.भ.प. (सा.का.) श्रीकृष्ण थोपटे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे त्वरित बुजवावेत, पाण्याचा योग्य निचरा करावा आणि निकृष्ट कामाबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जागे होऊन खानापूर–राजगड रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!