August 5, 2026 12:13 pm

MH-CET निकालातील गैरव्यवहाराचे आरोप सीईटी सेलने फेटाळले; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पर्सेंटेज आणि पर्सेंटाइलमधील फरक समजून न घेतल्याने संभ्रम; आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार

मुंबई : देशभरात विविध प्रवेश परीक्षांमधील कथित गैरप्रकारांवरून राजकीय वातावरण तापले असतानाच महाराष्ट्रातील एमएच-सीईटी परीक्षेच्या निकालाबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि महादेव बालगुडे यांनी निकाल प्रक्रियेत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने पत्रकार परिषद घेऊन अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगत पेपरफुटी आणि निकालातील गैरव्यवहारासंबंधीचे आरोप फेटाळून लावले. सोशल मीडियावर प्रसारित केले जाणारे काही दावे दिशाभूल करणारे असून त्यामध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्राप्त झालेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने सीईटी सेलकडून अंतर्गत विश्लेषण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहावी किंवा बारावीच्या बोर्ड परीक्षेत मिळालेले गुण आणि सीईटी परीक्षेतील पर्सेंटाइल यांची थेट तुलना करता येत नाही. काही विद्यार्थी बोर्ड परीक्षेपेक्षा प्रवेश परीक्षेच्या तयारीला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे बोर्डाच्या तुलनेत सीईटीमध्ये त्यांची कामगिरी चांगली होऊ शकते. एका परीक्षेतील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्याने दुसऱ्या परीक्षेतही तेवढेच गुण मिळवले पाहिजेत, अशी अपेक्षा करणे योग्य नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे ‘पर्सेंटेज’ आणि ‘पर्सेंटाइल’ या दोन स्वतंत्र मूल्यमापन पद्धती आहेत. विद्यार्थ्याला १०० पर्सेंटाइल मिळाल्याचा अर्थ त्याने प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन १०० टक्के गुण मिळवले, असा होत नाही. संबंधित बॅचमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला १०० पर्सेंटाइल दिले जाते. त्या विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष म्हणजेच ‘रॉ स्कोअर’ ७०, ८० अथवा ९० टक्केही असू शकतो. मात्र, तो संबंधित बॅचमधील अव्वल विद्यार्थी असल्यामुळे त्याचे पर्सेंटाइल १०० असते, असे त्यांनी सांगितले.

वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल निश्चित करण्यासाठी प्रमाणित पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे केवळ बोर्डाचे गुण आणि सीईटी पर्सेंटाइल यांची तुलना करून निकालात घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याची भूमिका सीईटी सेलने मांडली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या दाव्यांबाबत सीईटी सेलकडून मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची पोलीस आणि सायबर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

विरोधकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनंतर सीईटी सेलने आपली बाजू स्पष्ट केली असली, तरी अंतर्गत विश्लेषणातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!