July 25, 2026 11:28 am

एआयच्या बळावर शेती समृद्धीचा नवा अध्याय; ‘अजितदादा पवार कृषी समृद्ध कर्ज योजना’ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – सुनेत्रा पवार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें
पुणे, दि. – बदलत्या काळात शेती अधिक उत्पादक, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक बनला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज असून, या माध्यमातून राज्यातील शेती समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘आदर्श शेतकरी सन्मान सोहळ्या’त त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील होते. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, साखर आयुक्त संजय कोलते यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी, सभासद, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राज्य शासनाने शेतीच्या विकासासाठी सातत्याने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात तब्बल ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याच दूरदृष्टीचा पुढील टप्पा म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी ‘अजितदादा पवार कृषी समृद्ध कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपकरणे, सिंचन सुविधा, तंत्रज्ञानाधारित शेती आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार असून, यामुळे शेती अधिक स्पर्धात्मक आणि फायदेशीर बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून पिकांचे आरोग्य, रोग व कीड नियंत्रण, हवामानाचा अचूक अंदाज, पाण्याचे नियोजन, खतांचा संतुलित वापर आणि उत्पादन वाढीसाठी योग्य निर्णय घेणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे भविष्यातील शेती ही विज्ञान, तंत्रज्ञान आणि सहकाराच्या बळावर अधिक सक्षम होईल. महिलांच्या योगदानाचा गौरव करताना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, राज्य शासनाने महिलांना अधिकृतपणे ‘शेतकरी’ म्हणून दर्जा दिला आहे. हा निर्णय महिलांच्या शेतीतील योगदानाचा सन्मान करणारा असून, त्यामुळे महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पीडीसीसी बँकेचे कौतुक करताना ही बँक शेतकऱ्यांसाठी ‘कल्पतरू’ ठरल्याचे सांगितले. सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत असून, ग्रामीण विकासात अशा संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन करताना, एआय हा शेतीतील हुशार सल्लागार असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक अचूक, कमी खर्चिक आणि नफ्याची बनविता येईल. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पीडीसीसी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, एकेकाळी ३१४ कोटी रुपयांच्या ठेवी असलेली बँक आज १७ हजार ५०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ बनली आहे. शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या विश्वासामुळेच ही प्रगती शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले. त्यांनी बँकेच्या विविध शेतकरी हिताच्या योजना, कर्ज सुविधा आणि सहकार क्षेत्रातील उपक्रमांची माहिती दिली. प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव या सोहळ्यात राज्यभरातील प्रगतिशील आणि नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘कृषी पुरस्कार-२०२४’ चे वितरणही करण्यात आले. यामध्ये ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ छाया पवार आणि तानाजी पवार यांना प्रदान करण्यात आला. तर ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ समीर डोंबे आणि सुजाता डोंबे या दाम्पत्याला देऊन त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आधुनिक शेती, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि उत्पादनवाढीसाठी केलेल्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. मोठ्या उत्साहात आणि शेतकरी बांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात आधुनिक शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, सहकार आणि शेतकरी सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत ग्रामीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!