वणी शहरातील सर्वात गजबजलेल्या गांधी चौक परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी एका व्यक्तीच्या अंगावर घाण टाकून केवळ काही सेकंदांच्या हातचलाखीने तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली.एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही घटना आज मंगळवारी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली आहे.
लालगुडा येथील शंकर धोटे यांनी काही साहित्य खरेदी करण्यासाठी वणी येथील स्टेट बँकेतून ५० हजार रुपयांची रोकड काढली होती. ही रक्कम त्यांनी अत्यंत सुरक्षितपणे एका पिशवीत ठेवली आणि ती पिशवी आपल्या दुचाकीच्या हँडलला घट्ट अडकवली. बँकेतून बाहेर पडताना आपल्याला कोणीतरी पाहतंय, याचा पुसटसा सुगावाही त्यांना नव्हता. पण, दबा धरून बसलेल्या दोन शातीर चोरट्यांनी बँकेपासूनच त्यांच्यावर नजर ठेवली होती. धोटे जसे जसे पुढे जात होते, तसे तसे हे चोरटे सावलीसारखे त्यांच्या मागे चालले होते.
धोटे यांची दुचाकी जेव्हा गांधी चौकातील देवडे यांच्या किराणा दुकानाजवळ पोहोचली, तेव्हा चोरट्यांनी आपली मुख्य चाल खेळली. त्यांनी अत्यंत हुशारीने धोटे यांच्या अंगावर घाण टाकली. चालू गाडीवर अचानक अंगावर घाण पडल्यामुळे धोटे पूर्णपणे गोंधळले. काय झाले हे पाहण्यासाठी त्यांनी आपली दुचाकी बाजूला लावली आणि ते आपले शर्ट साफ करू लागले.
धोटे यांचे लक्ष शर्ट साफ करण्यात पूर्णपणे गुंतले असताना, मागून आलेल्या चोरट्याने अत्यंत चपळाईने, कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने दुचाकीला लटकवलेली ५० हजारांची पिशवी क्षणार्धात ओढली. धोटे यांना कळेपर्यंत तो चोरटा गर्दीचा फायदा घेऊन वाऱ्याच्या वेगाने पसार झाला होता. शर्ट साफ करून जेव्हा धोटे गाडीकडे परतले, तेव्हा हँडलवर पिशवी नव्हती! ५० हजार रुपये गायब झाल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
हा सगळा प्रकार एवढ्या वेगाने घडला की आजूबाजूच्या कोणालाही याचा पत्ता लागला नाही. मात्र, चोरट्यांचे नशीब खराब होते, कारण हा संपूर्ण प्रकार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अगदी स्पष्टपणे कैद झाला आहे. चोरट्याने कशा प्रकारे पाळत ठेवली, अंगावर घाण टाकून लक्ष कसे विचलित केले आणि पैशांची पिशवी कशी लांबवली, हे सर्व फुटेजमध्ये दिसत आहे. सध्या वणी पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
या घटनेने वणी शहरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बँक किंवा एटीएममधून मोठी रक्कम काढल्यानंतर नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. ‘अंगावर घाण पडली आहे’ किंवा ‘पैसे खाली पडले आहेत’ असं सांगून लक्ष विचलित करणाऱ्या टोळ्या सध्या सक्रिय आहेत. त्यामुळे अशा वेळी आधी आपले पैसे सुरक्षित ठेवा आणि मगच इतर गोष्टींकडे लक्ष द्या, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.










