येथे रेकॉर्डवरील आरोपीने शिंदेसेनेच्या उपजिल्हाप्रमुखास आधी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाने शिव्या दिल्या. नंतर भेटायला बोलवत आव्हान दिलं. शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख पुतण्यासोबत भेटायला गेल्यानंतर मस्करी केल्याचं म्हणत आरोपीने गळाभेट घेतली आणि तेव्हाच घात केला.
आरोपीनं उपजिल्हाप्रमुखांच्या मानेवर चाकूने हल्ला केला. या घटनेत उपजिल्हाप्रमुख गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना रविवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास महावीर चौकात घडली. या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार राम शेषराव बोडखे याच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गंभीर जखमी उपजिल्हाप्रमुखाचे अंबादास म्हस्के (वय ५५, रा. पडेगाव) असे नाव आहे. त्यांचा पुतण्या खंडू म्हस्के यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार २४ मे रोजी रात्री १० वाजेपासून राम हा अंबादास यांना फोन करून शिव्या देत होता. नशेत तो शिव्या देत असेल, असे समजून त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, राम सातत्याने फोन करून शिवीगाळ करायचा. शेवटी त्याने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाने शिव्या द्यायला सुरुवात केली. तसेच हिंमत असेल तर महावीर चौकात भेटायला ये, म्हणून आव्हान दिले.
या घटनेची माहिती अंबादास यांनी हॉटेल व्यावसायिक पुतण्यास सांगितली. त्यानुसार अंबादास आणि खंडू हे थार गाडीने महावीर चौकात आले. रामने म्हस्के यांना कधी पंचवटी चौकात, तर कधी महावीर चौकात असल्याचे सांगून बराच वेळ फिरवले. अखेरीस म्हस्के यांना राम हा महावीर चौकातून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जणाऱ्या रस्त्याच्या वळणावर दिसला. त्यांनी थार गाडी त्याच्याजवळ नेऊन उभी केली.
अंबादास म्हस्के हे गाडीतून उतरताना दिसताच रामने ‘अण्णा, मी मजाक करत होतो’, असे म्हणत त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर रामने लगेचच कंबरेचा चाकू काढून अंबादास म्हस्के यांच्या मानेपासून कानापर्यंत जबर वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. अंबादास म्हस्के यांच्यावर सुरुवातीला घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात हलविले आहे.
आरोपी राम बोडखे हासुद्धा झटापटीत जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे क्रांती चौक पोलिसांनी सांगितले. घटनेमागचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत.











