अहमदाबादमधील कालूपुर परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या मुख्य शाखेतून तब्बल ८.७० कोटी रुपयांची हेराफेरी करणाऱ्या संयुक्त कस्टोडियनला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या.
हरसिद्ध कडियार असे अटक करण्यात आलेल्या बँक अधिकाऱ्याचे नाव असून, तो गेल्या १५ वर्षांपासून या बँकेत कार्यरत होता. केवळ चैनीसाठी त्याने बँकेच्या तिजोरीवरच दरोडा टाकला. या चोरीच्या पैशातून त्याने आलिशान बंगला, दुकान आणि महागडी वाहने खरेदी केल्याचे तपासात उघड झाले.
बँकेच्या कालूपुर शाखेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे करन्सी चेस्ट आहे, जिथून इतर बँकांना रोकड पुरवली जाते. या विभागात संजय शर्मा मुख्य कस्टोडियन, तर आरोपी हरसिद्ध कडियार संयुक्त कस्टोडियन म्हणून काम पाहत होता.
काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑडिटमध्ये आणि नवीन कस्टोडियन्सनी स्टॉक तपासल्याव ५०० रुपयांच्या नोटांचे चक्क १७४ बंडल गायब असल्याचे समोर आले. याची एकूण किंमत ८.७० कोटी रुपये होती. हा प्रकार उघडकीस येताच बँक अधिकाऱ्यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये १३ जानेवारी रोजी आरोपी हरसिद्ध कडियार बँकेतून काही मोठे बॉक्स बाहेर नेताना दिसला. सहकाऱ्यांनी विचारणा केली असता, या बॉक्समध्ये कचरा असून तो फेकायला जात आहे, असे त्याने सांगितले होते.
पोलीस तपासात आरोपीचा एक अत्यंत चलाख आणि नियोजनबद्ध प्लॅन समोर आला. जानेवारी महिन्यात चोरी केल्यानंतरही तो तब्बल ३ महिने नियमितपणे बँकेत नोकरीवर येत होता. बँकांमधील सीसीटीव्ही फुटेजचा बॅकअप ९० दिवसांनंतर आपोआप डिलीट होतो, याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे ९० दिवस पूर्ण झाले की पुरावा नष्ट होईल, या आशेने तो थांबला होता.
हा कालावधी संपताच, १३ एप्रिल रोजी त्याने आजारी असल्याचे सांगून सुट्टी घेतली. त्यानंतर ५ दिवसांची मेडिकल लीव्ह वाढवून घेतली आणि २० एप्रिलपासून तो अचानक बेपत्ता झाला. दरम्यान, बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी आपल्या कुटुंबीयांसह थेट मनालीला फिरायला गेला होता, मात्र पोलीस मागे लागल्याचे कळताच तो तिथूनही पळाला. शेवटी पोलिसांनी त्याला अहमदाबादमधून अटक केली.
आरोपीने बँकेतून लुटलेल्या पैशांची मोठी गुंतवणूक केली होती. अहमदाबादच्या चांदखेडा भागात त्याने २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा आलिशान बंगला खरेदी केला. व्यवसायासाठी १ कोटी ४० लाख रुपयांचे एक दुकान विकत घेतले. पोलिसांनी सोला भागातील त्याच्या घराखाली उभी असलेल्या कारमधून २.२० कोटी रुपयांची रोकड जप्त केली. याशिवाय आणखी २२ लाख रुपये रोख, एक कार, मोबाईल फोन आणि एक मालवाहू ट्रक जत करण्यात आला आहे. त्याने आपल्यासोबत काम करणाऱ्या वैशाली बेन नावाच्या महिला सहकाऱ्याला घर खरेदी करण्यासाठी २८ लाख रुपये दिले होते. तसेच काही रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्येही गुंतवली होती.
महत्त्वाचे म्हणजे, आरोपी हरसिद्ध कडियार याची पत्नी रेल्वे पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. घरात अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड आणि मालमत्ता येत असताना पत्नीला याची कल्पना होती का? यात तिची काही भूमिका आहे का? यादृष्टीनेही पोलीस आता तपास करत आहेत. या गुन्ह्यात रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी मदत करणाऱ्या सुलतान आणि जुल्फिकार नावाच्या दोन संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.











