पुणे:- विष्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) पुणे येथील सोशल वेल्फेअर अँड डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “स्पंदन २०२६” या उपक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकी, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुणांचा संगम असलेल्या या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमामध्ये २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती मिनल कळसकर उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेतले अनुभव सांगत “घाबरू नका, प्रयत्न करत राहा” हा प्रेरणादायी संदेश दिला. मराठी माध्यमातून शिक्षण घेत UPSC-MPSC परीक्षांपर्यंतचा त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
स्पंदन अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवले. सिंहगड, खडकवासला धरण परिसर आणि आळंदी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमांमध्ये ७० पोती म्हणजेच ५००+ किलो कचरा संकलित करत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. निवडणुकांदरम्यान 30 विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करत विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवले. ग्रामीण आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील १० हून अधिक शाळांमध्ये बेसिक सायन्स सेशन्स घेण्यात आले.
तंत्रज्ञान आणि समाजकारण यांचा संगम घडवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी ते १० वी मधील १०००+ विद्यार्थ्यांना AI विषयाची प्राथमिक ओळख करून देणारी सत्रे घेतली. पर्यावरण संवर्धनासाठी सीडबॉल मेकिंग, पक्ष्यांसाठी पाणी व खाद्य फीडर तयार करणे अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय रक्तपेढीसाठी वेबसाइट सपोर्ट, विविध NGO साठी वेबसाइट डेव्हलपमेंट, तसेच समाजाभिमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वृद्धाश्रम भेटींसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.
कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या सामाजिक आणि तांत्रिक प्रकल्पांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
VIT च्या विद्यार्थ्यांनी समाजासाठी राबवलेल्या या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि तंत्रज्ञानाचा समाजहितासाठी वापर यांचा सुंदर संगम “स्पंदन २०२६” मधून पाहायला मिळाला. भविष्यातही Team स्पंदन तर्फे अशा सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाचे नेतृत्व सार्थक देशमुख आणि रुचिता बाबर यांनी केले.











