पुणे: जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे येथे पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात एकूण ५३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, ते आता व्यावसायिक विश्वात पदार्पण करत असल्याने, हा समारंभ त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमी, पुणे येथील संचालक डॉ. बी. सी. पटनायक यांची उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबतच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेचे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर, प्रभारी संचालक डॉ. एन. बी. हुल्ले, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे येथील प्र-कुलगुरू डॉ. वैभव हेन्द्रे, अधिष्ठाता डॉ. एन. यू. कोरडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. पूजा मेहरोत्रा आदि मान्यवरही उपस्थित होते.
या समारंभादरम्यान, आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल सुमारे ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यांना उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
प्रमुख पाहुणे डॉ. बी. सी. पटनायक म्हणाले, की अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शिक्षणाच्या क्षेत्रात भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगती केली आहे. भारतीय विद्यार्थी जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आपल्या प्रतिभेची यशस्वीपणे चुणूक दाखवत आहेत. पदवीधरांनी सतत काहीतरी शिकत राहावे. आपल्या कौशल्यांचा विकास करत राहावे.
डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले की पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. हा क्षण विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या दोघांसाठीही अत्यंत अभिमानास्पद असतो. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास बाळगण्यास, बदलत्या जागतिक परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि यश संपादन करण्यासाठी आपल्या स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावे.
डॉ. एन. बी. हुल्ले यांनी म्हणाले की, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणे केवळ उद्योगासाठी सज्ज रोजगार निर्मितीवरच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता रुजवून ती जोपासण्यावरही विशेष भर देते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सारिका खोपे आणि सुरभी प्रणव यांनी केले, तर डॉ. पूजा मेहरोत्रा यांनी आभार प्रदर्शन केले. रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्री. श्रेयस रायसोनी, कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर आणि प्रभारी संचालक डॉ. एन. बी. हुल्ले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.











