कल्याणनजीक म्हारळ गावात एका ३० वर्षीय तरुणाचा हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव रविंद्र आहिरे असे आहे.ही घटना मलखन कंपाऊंड परिसरात घडली. टिटवाळा पाेलिसांनी या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे. आराेपीची नावे दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे अशी आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी डांगे याने अहिरे यांच्या मानलेल्या बहिणीच्या मुलीची छेड काढली होती. घडला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने हा प्रकार तिचा मानलेला भाऊ आहिरे याला सांगितला. आहिरे याने मुलीच्या आईला पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला होता. ही बाब डांगे याला कळाली. त्याने रागाच्या भरात आहिरे याच्या हत्येचा कट रचला.
डांगे याने त्याचे मित्र विजय आणि परशूराम या दोघांना सोबत घेऊन आहिरे याला गाठले. तिघांनी आहिरे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात आहिरे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांना हत्येची घटना कळताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. एका तासाच्या आतच आहिरेच्या हत्येच्या आरोपींना अटक केली. तिन्ही आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपींना २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आहिरे हा एका खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होता. शुक्रवारी रात्री सात वाजताच्या सुमारात त्याच्या आईची प्रकृती बिघडली होती. तो आईला तातडीने दवाखान्यात घेऊन गेला. त्याने आईला दवाखान्यातून घरी आणले. त्यानंतर तो काही वैयक्तीक कामानिमित्त पुन्हा ९ वाजता घराबाहेर पडला. तो मलखन कंपाऊंडजवळ येतात त्याठिकाणी अंधारात आरोपी दबा धरुन बसले होते. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याला ठार केले.











