वारकऱ्यांचा पंढरपुरातील प्रवेश यंदा सुखकर होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सुरू असलेल्या ‘पंढरपूर टाउन’ प्रकल्पातील कामांना वेग आला आहे. मलपे ओढा व वाखरी पुलाचे काम वेगाने सुरू असून, यंदाच्या आषाढी वारीच्या पूर्वीच हे काम पूर्ण होईल, असा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला आहे.त्यामुळे पालखीसोबत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना खड्डे, चिखल तुडवत पंढरीत प्रवेश करावा लागणार नाही.
‘पंढरपूर टाउन’ प्रकल्पाअंतर्गत वाखरी ते थेट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे सुमारे आठ किलोमीटरचे काम केले जात आहे. यासाठी सुमारे ८३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दोन्ही पालखी मार्ग हे वाखरीपर्यंत आल्यावर संपत होते. परिणामी पंढरपूरमध्ये प्रवेशावेळी वारकऱ्यांची गैरसोय होत होती. हे लक्षात घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पंढरपूर टाऊन प्रकल्पाअंतर्गत वाखरी ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत शहरांतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाचा भाग असलेल्या वाखरी पूल व मलपे ओढ्याचे काम वेगाने सुरू आहे.
पालख्या पंढरीत दाखल होण्याच्या आधीच हे दोन्ही काम पूर्ण होतील. उर्वरित कामांना पूर्ण होण्यास मात्र आणखी किमान वर्षभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे.मलपे ओढा व वाखरी पूल ते सरगम चौक रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. यंदाच्या आषाढी वारीच्या आधीच हे काम पूर्ण होईल. त्यामुळे पंढरीत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांचा पंढरपुरातील प्रवेश सुखकर होण्याची शक्यता आहे.
आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व संतांच्या पालख्या वाखरी येथे विसावतात. तेथून लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या रुंदीकरणामुळे वारकऱ्यांना चालण्यासाठी प्रशस्त आणि सुरक्षित स्वतंत्र मार्गिका मिळणार आहे. सणांच्या काळात पंढरपुरात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीवर हा प्रकल्प कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. पुणे, सोलापूर आणि कोल्हापूरला जोडणारे महामार्ग आधीच पूर्णत्वास येत आहेत. बाहेरील महामार्गावरून थेट विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचणे भाविकांसाठी अत्यंत सोयीचे ठरणार आहे.
पहिला टप्पा (चौपदरीकरण) : एमआयटी महाविद्यालय ते अर्बन बँक या सुमारे सात किलोमीटरच्या अंतरात रस्ता चौपदरी केला जात आहे. वारकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी यामध्ये दोन छोटे पूल, एक भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
दुसरा टप्पा (दुपदरी सिमेंट रस्ता) : अर्बन बँक ते थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा रस्ता पूर्णपणे सिमेंटचा आणि दुपदरी होणार आहे.











