अकोला शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या मामासह चार जणांनी मिळून एका तरुणाची भरबाजारात निर्घृण हत्या केली. या थरारक ‘ऑनर किलिंग’च्या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्हा हादरला आहे.
या प्रकरणातील फरार आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुसक्या आवळल्या असून, त्यांना जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
हत्या झालेल्या तरुणाचं नाव राहुल कालू सारसर असं आहे. राहुलने आरोपीच्या भाचीसोबत तिच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला होता. हाच राग मुलीच्या मामाच्या मनात सलत होता. याच वादातून १५ मे रोजी अकोला शहरातील गजबजलेल्या अलंकार मार्केटमध्ये आरोपींनी राहुलला गाठले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी राहुलवर लोखंडी पाईप आणि तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की राहुलचा जागीच मृत्यू झाला. भरबाजारात झालेल्या या हत्येमुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
या घटनेनंतर रामदास पेठ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९ (२), १९०, १९१ (२), १९१(३), ६१(२), १०३ (२), ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या तपास सुरू केला.
मुख्य आरोपी बादशहा सरु पारोचे (वय ३५ वर्ष, रा. वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) हा शहरातून फरार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला सर्वात आधी ताब्यात घेऊन रामदास पेठ पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. त्यानंतर उर्वरित तीन आरोपी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात लपल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.
संतोष रामचरण पारोचे (वय २४ वर्ष, रा. विजय नगर, तारफैल, अकोला), गौरव राहुल करोसीया (वय १८ वर्ष, रा. डॉ. आंबेडकर नगर, वरणगाव, जि. जळगाव), हरीश उर्फ हर्षद राहुल करोसीया (वय २० वर्ष, रा. डॉ. आंबेडकर नगर, वरणगाव, जि. जळगाव) अशी अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावं आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या चारही आरोपींना पुढील चौकशीसाठी रामदास पेठ पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.











