June 5, 2026 11:34 am

पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंना मोठा दिलासा!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना अपघात विमा संरक्षण देण्याचा निर्णय क्रीडा, कला व साहित्य व सांस्कृतिक समितीने घेतला. अनेक खेळाडू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असल्याने स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विमा कवच उपयुक्त ठरणार आहे.विम्याचा हप्ता महापालिका भरणार असल्याचे सभापती कैलास कुटे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील नवोदित कलाकार, विद्यार्थी व नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध भागांत कला व सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून चित्रकला, संगीत, नृत्य आणि नाट्य यासारख्या कलांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. क्रीडा विभागाचे क्रीडा, कला, साहित्य, पर्यटन व सांस्कृतिक विभाग असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबराेबर शहरामध्ये कला व सांस्कृतिक मार्गदर्शन कार्यशाळा आणि क्रीडा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.

महापालिकेंतर्गत पं. भीमसेन जोशी संगीत अकादमी (निगडी), सावित्रीबाई फुले अकादमी (वाकड), सार्वजनिक ग्रंथालये, स्पर्धा परीक्षा केंद्रे, तसेच क्रांतिवीर चापेकर वाडा (चिंचवडगाव) यांसारख्या विविध संस्थांद्वारे सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्राला चालना दिली जात आहे. या सर्व उपक्रमांना एकत्रित व सुसूत्र दिशा देण्यासाठी एकात्मिक धोरण राबविण्यात येणार असल्याचे कुटे यांनी सांगितले.

शहरामध्ये क्रीडा संकुले आणि मैदाने विकसित होत असताना खेळाडूंना केवळ शारीरिक सरावाचीच नव्हे, तर खेळातील तंत्रज्ञान, नियम आणि जागतिक क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाचीही गरज असते. त्यामुळे खेळाशी संबंधित नियमावली आणि माहितीपर साहित्यासाठी क्रीडा ग्रंथालयाची निर्मिती केली जाणार आहे. या ग्रंथालयात जागतिक स्तरावरील नामांकित खेळाडूंची चरित्रे आणि आत्मचरित्रे, विविध खेळांच्या नियमावलीची अधिकृत पुस्तके, क्रीडा आहारशास्त्र, मानसशास्त्रावरील पुस्तके, व्यायाम, योगासने आणि फिजिओथेरपी संदर्भातील माहितीपर साहित्य, ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांचा ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध असणार आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!