June 5, 2026 3:05 pm

भररस्त्यात एक घटना घडली अन् काही तासातच त्याने.; परळीत हुशार तरुणाचा दुर्दैवी अंत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे.

भररस्त्यात एका तरुणीने सर्वांसमोर कानशिलात लगावल्यामुळे झालेला अपमान सहन न झाल्याने एका सुशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना परळी तालुक्यातील मोहा गावात घडली. चंद्रहार राजेभाऊ शिंदे असे आत्महत्या केलेल्या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रहार शिंदे हा डिझेल मेकॅनिकल डिप्लोमा झालेला अत्यंत हुशार तरुण होता. बुधवारी करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात दीपाली बबन पोटभरे नावाच्या तरुणीने त्याला सर्वांसमक्ष थोबाडीत मारली होती. या जाहीर अपमानामुळे चंद्रहार प्रचंड निराश झाला होता. त्याला जबर मानसिक धक्का बसला. हा अपमान सहन न झाल्याने गुरुवारी त्याने गावातील एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

चंद्रहारच्या आत्महत्येनंतर शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर चंद्रहारच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी आपला तीव्र आक्रोश व्यक्त केला. माझ्या मुलाने त्याच्या मनातील दुःख कोणालाच सांगितले नाही, ते त्याच्या पोटातच राहिले. त्याला झालेल्या अपमानामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी आरोपी अजूनही मोकाट आहेत. आरोपींना तात्काळ अटक करून आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा,” अशी मागणी त्याच्या पालकांनी केली आहे.

तर दुसरीकडे, मुख्य आरोपी दीपाली पोटभरे हिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिने सांगितले की, “मी त्याला कोणतीही चापट मारलेली नाही. आमचे कोणतेही वैयक्तिक भांडण नव्हते, उलट आमचे संबंध चांगले होते. मी माझ्या मुलासोबत जात असताना तो ऐकत नव्हता, म्हणून मी मुलाला घरी जाण्यासाठी एक दगड मारला होता. मात्र, चंद्रहारने माझ्यावर चुकीचा आरोप केला की मी त्याला दगड मारला. त्यामुळे माझ्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा असून या प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी दीपालीने केली आहे.

या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात दीपाली पोटभरे हिच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी भररस्त्यात नेमका काय प्रकार घडला होता आणि तरुणाच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे, याचा सखोल तपास सिरसाळा पोलीस करत आहेत. मात्र, घटनेला वेळ होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!