नगरसेवकांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या कुटुंबासोबत गावी अथवा फिरायला बाहेर जाता यावे, यासाठी सभागृहाच्या बैठकांचे नियोजन करून दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी देण्यात येते. यावेळी नगरसेवकांना 22 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या बैठकीसह विविध समित्यांच्या बैठकांमुळे नगरसेवकांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुटुंबासोबत फिरायला बाहेर जाता येत नाही. सभागृहाची बैठक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आटोपशीर घेऊन जून महिन्यातील सभागृहाची बैठक अखेरीस घेण्यात येते. त्यामुळे नगरसेवकांना सव्वा ते दीड महिन्याचा सुट्टीचा कालावधी मिळतो. यावेळी शुक्रवार 8 मे ला सभागृहाची अंतिम बैठक ठेवण्यात आली होती.
स्थायी समितीची बैठक मात्र दर आठवड्याला घेणे बंधनकारक असल्यामुळे या समितीच्या सदस्यांना नऊ ते दहा दिवसाची सुट्टी मिळावी याकरिता एका आठवड्यात सोमवारी तर दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी समितीची सभा येते. त्यामुळे सदस्यांना दहा दिवस आपल्या कुटुंबासह बाहेर जाता येते. इतर समित्यांच्या बैठका मात्र 15 दिवसांनी होत असल्यामुळे त्या समितीतील सदस्यांना दहा ते पंधरा दिवसांसाठी कुटुंबासोबत फिरायला वेळ मिळतो.
अनेक नगरसेवकांनी कुटुंबासोबत गावी तर काही नगरसेवकांनी देश विदेशात फिरण्याचा प्लान केला आहे. मात्र नगरसेवकांचा परदेश दौऱ्याचा प्लान मात्र गुप्त ठेवण्यात आला आहे. हा प्लान अन्य नगरसेवकांना समजू नये यासाठी ही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
नगरसेवकांना मुंबई सोडायची असेल तर आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांना न सांगता कोणीही मुंबई सोडू शकत नसल्याचे एका नगरसेवकाने सांगितले. महापालिका मुख्यालयात आल्यानंतर बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक आहे.










