कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील सार्वजनिक वर्दळीचे रस्ते, मोकळी मैदाने येथे कोठेही आठवडी बाजार भरविण्यात येऊ नयेत. .या बाजारांमुळे वाहतुकीला अडथळा होतोच, त्याच बरोबर परिसरातील नागरिकही या बाजारातील गोंगाटामुळे, ध्वनीक्षेपकावरून होणाऱ्या सततच्या ध्वनीप्रदुषण करणाऱ्या घोषणांमुळे त्रस्त होतात.
त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी अशा सर्व आठवडी बेकायदा बाजारांवर नियमित कारवाई करावी, असे आदेश कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.
बुधवारी कल्याण डोंबिवली पालिकेत शहरातील विकास कामांच्या विषयावर आढावा बैठकीचे खासदार डाॅ. शिंदे यांनी आयोजन केले होते. यावेळी पालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर ॲड. हर्षाली चौधरी, सभापती मल्लेश शेट्टी उपस्थित होते. या बैठकीनंतर खासदार डाॅ. शिंदे यांना कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात भरणाऱ्या आठवडी बाजारांच्या विषयावर माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न केला होता.
यावेळी बोलताना खासदार डाॅ. शिंदे यांनी सांगितले, कल्याण, डोंबिवली शहरातील बाजारपेठांच्या जागा निश्चित आहेत. शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. मोकळ्या जागा या सोसायट्यांच्या परिसरात असतात. अशा भागात फेरीवाल्यांनी बाजार थाटले तर रस्त्यावरून येजा करणारी वाहने, पादचाऱ्यांना या बाजाराचा त्रास होतो. बाजारामुळे वर्दळ वाढत असल्याने चोरी लुटमारीच्या घटना याठिकाणी घडतात. स्थानिक रहिवाशांना या बाजारामुळे येजा करण्यास त्रास होतो.
तसेच, मोकळ्या जागांवर बाजार भरवले जातात त्याठिकाणी फेरीवाले मोठ्याने ओरडून आपले सामान विक्री करण्यासाठी गोंगाट करतात. काही जण ध्वनीक्षेपकावरून सतत घोषणा देऊन मालाची विक्री करतात. त्यामुळे परिसरात ध्वनीप्रदूषण होते. स्थानिक नगरसेवक या बेकायदा बाजारांच्या विरोधात आहेत. स्थानिक रहिवाशांच्या या बेकायदा बाजाराच्या विरूध्द खूप तक्रारी आहेत. त्यामुळे पालिकेने शहराच्या विविध भागात अशाप्रकारचे बेकायदा आठवडी बाजार भरणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे, अशा सूचना खासदार डाॅ. शिंदे यांनी महापौर ॲड. चौधरी, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांच्या उपस्थितीत दिल्या. पालिकेवरील असे बाजार हटविण्याची जबाबदारी वाढली आहे.
पालिकेच्या पहिल्याच महासभेत शहराच्या विविध भागात भरणाऱ्या आठवडी बाजारावरून सर्व पक्षीय नगरसेवकांनी तक्रारी करून ते बाजार हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिका प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी आपल्या हद्दीतील असे आठवडी बाजार हटविण्याची जोरदार मोहीम सुरू केली होती. यावेळी या बाजारांचे आश्रयदाते स्थानिक भाई, दादा यांनी दादागिरी करून पालिका अधिकाऱ्यांना हे बाजार हटविण्यापासून परावृत्त केले होते. त्यामुळे पालिकेने दोन महिन्यापूर्वी पालिका फक्त सार्वजनिक रस्त्यांवरील बेकायदा आठवडा बाजार हटवेल अशी भूमिका घेतली होती. अनेक खासगी जमीन मालकांनी शहराच्या विविध भागातील आपल्या मोकळ्या जागेत फेरीवाल्यांना बाजार भरविण्यासाठी जागा देऊन भाडे वसुली सुरू केली होती. या बेकायदा बाजारातून पालिकेला एक पैशाचा महसूल मिळत नव्हता. पण, फेरीवाला हटाव पथकातील कामगार या बाजारांना पाठबळ देऊन दौलतजादा करत असल्याच्या तक्रारी होत्या.
डोंबिवली पश्चिमेत शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या आशीर्वादाने रस्त्यावर बाजार भरविला जातो. स्थानिकांनी याविषयी पालिकेत तक्रारी करताच या नगरसेवकाच्या इशाऱ्यावरून स्थानिक रहिवाशांनी तक्रार करणाऱ्या सोसायटीत जाऊन तेथील महिला, पुरूष यांच्याशी वाद घातला होता. डोंबिवली जीमखाना ते सागर्ली गाव ते अभिनव मंदिर शाळा, खंबाळपाडा, डोंबिवली पश्चिमेतील राजपार्क सोसायटी परिसरातील बेकायदा बाजार काही पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावरून चालत असल्याच्या तक्रारी आहेत.










